प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तू आमच्या घरासमोरील रस्त्याने का जातो. तू आमच्या घरासमोरील रस्त्याने जायचे नाही, असे म्हणून चार जणांनी मिळून पाटीलबा बाचकर यांना कु-हाड, लाकडी दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.8) घडली. घटनेत बाचकर हे गंभीर जखमी झाले. याबाबत बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांत राहुरी बाजार समितीचा माजी उपसभापती तथा विद्यमान संचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटीलबा हे पत्नी मिराबाई व मुलगा कुंदन यांच्याहस गोटुंबे आखाडा येथे राहतात. पाटीलबा हे सध्या पाटबंधारे विभाग राहुरी येथे नोकरीस आहे. तसेच त्यांच्या घराचे शेजारी आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा त्याचे कुटुंबासह एकत्रित राहत आहे. पाटीलबा बाचकर आणि अण्णासाहेब बाचकर या दोघांमध्ये रस्त्याच्या जाण्या येण्यावरुन वाद आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता पाटीलबा बाचकर हे अण्णासाहेब बाचकर यांच्या घरासमोरील रस्त्यावरुन कामावर जात असताना आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा हातात लोखंडी कु-हाड घेऊन, अमोल आण्णासाहेब बाचकर हा हातात लाकडी दांडा घेऊन तसेच तेजस आण्णासाहेब बाचकर व अनिता आण्णासाहेब बाचकर हे तिथे आले व पाटीलबा बाचकर यांना शिवीगाळ करुन आण्णासाहेब बाचकर हा म्हणाला की, तू आमच्या घरासमोरील रस्त्याने का जातो? तू घरा समोरील रस्त्याने जायचे नाही.
यावर पाटीलबा बाचकर यांनी हा रस्ता सार्वजनिक आहे. त्यामुळे मी रस्त्याने जातो. असे म्हणाले असता आण्णासाहेब बाचकर याने त्याचे हातातील कु-हाडीचा दांडा पाटीलबा बाचकर यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने डोक्यात लाकडी दांडा मारला. तेजस बाचकर व अनिता बाचकर यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करु लागले. तेव्हा पाटीलबा बाचकर यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण त्यांचा मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर, पत्नी मिराबाई पाटीलबा बाचकर असे सोडवा सोडव करण्यासाठी आले. आण्णासाहेब बाचकर याने त्याचे हातातील कु-हाडीचा तुंबा मुलगा कुंदन याचे डोक्यात मारुन जखमी केले. तसेच अमोल बाचकर याने त्याच्या हातातील लाकडी दांडा मुलगा कुंदन याच्या डोक्यात, पाठीत मारुन त्यास जखमी केले. वरील सर्वांनी पाटीलबा बाचकर व त्यांची पत्नी मिराबाई, मुलगा कुंदन यांना खाली पडून लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर या रस्त्याने परत गेले तर तुमचा मुडदा पाडू अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत पाटीलबा रंगनाथ बाचकर यांनी स्वतः राहुरी पोलिसांत हजर राहून फिर्याद दिली आहे. त्यानुसार आण्णासाहेब रंगनाथ बाचकर, अमोल आण्णासाहेब बाचकर, तेजस आण्णासाहेब बाचकर, अनिता आण्णासाहेब बाचकर सर्व राहणार गोटुंबे आखाडा, तालूका राहुरी या चार जणांविरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित राठोड हे करित आहे.