Editorial : गर्भगळीत महागठबंधन

0

राष्ट्र सह्याद्री 11 जुलै

बिहार विधानसभेच्या निवडणुका आगामी चार महिन्यांत आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आभासी सभांच्या माध्यमातून अगोदरच प्रचार सुरू केला आहे. संयुक्त जनता दलानेही नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. भाजपप्रणीत आघाडीने नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवायचे जाहीर केले असताना राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसप्रणीत मित्रपक्षांची मात्र अजून भांडणेच चालू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून काहीच बोध न घेता विरोधकांत एकवाक्यता नाही.

महागठबंधनमध्ये समन्व्यय समिती स्थापन करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती; परंतु संयुक्त जनता दल, काँग्रेस या दोन पक्षांत अजूनही निवडणुकीच्या काळात वादाचे प्रसंग सुरू आहेत. गेल्या वेळी लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांनी एकत्र येऊन बिहार विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी लालूप्रसाद यांनी केलेल्या खेळ्या यशस्वी झाल्या होत्या. आता लालूंच्या कुटुंबातील भांडणे, लालूंचे आजारपण, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर असलेले घोटाळ्याचे आरोप पाहता गेल्या वेळी सर्वाधिक जागा जिंकणारा राष्ट्रीय जनता दल बॅकफुटवर गेला असला, तरी या पक्षाचे महागठबंधनातील स्थान अजूनही इतर पक्षांपेक्षा जास्त मजबूत आहे. त्याचे कारण बिहार सरकारविरोधात राष्ट्रीय जनता दलच खंबीर भूमिका घेत आहे.

आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांचे राजकीय बळ फारच कमी आहे. असे असताना जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस आणि अन्य घटक पक्ष राष्ट्रीय जनता दलावर दबाव आणीत आहेत. तेजस्वी यादव सरकारविरोधात एकाकी लढत असताना त्यांना अन्य पक्षांची साथ मिळत नाही. तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करायला अन्य पक्ष तयार नाहीत. लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर झारखंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असताना महागठबंधनमधील वाद सोडवून पक्षाला दिशा देण्याची जबाबदारी आली आहे. त्यांनी आता रुग्णालयातून निवडणुकीची सूत्रे हलवायला प्रारंभ केला आहे.

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपला पराभूत करण्यासाठी तिथून ते व्यूहनीती आखत आहेत. रांची येथून ते रिमोट कंट्रोलद्वारे सर्वांना एकाच धाग्यात बांधायचा प्रयत्न करतील. काँग्रेसचे स्थानिक नेते काहीही म्हणत असले, तरी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यांच्यात राजकीय सामंजस्य असल्याने आता काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असली, तरी ती तशीच राहण्याची शक्यता नाही.

लालूप्रसाद यांच्यावर झारखंडची राजधानी असलेल्या रांचीतील रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. बिहारच्या निवडणुका जवळ आल्यामुळे या रुग्णालयात दररोज गर्दी होत आहे. एकीकडे विरोधाचा आवाज काढायचा आणि लालूंची रुग्णालयात येऊन भेट घ्यायची, अशी महागठबंधनातील नेत्यांची विसंवादी भूमिका आहे. लालूंच्या युक्तीच्या चार गोष्टी जशा मागच्या वेळी उपयुक्त ठरल्या होत्या, तशाच त्या आताही ठराव्यात, असे महागठबंधनमधील नेत्यांना वाटते. तेजस्वी यादव यांना लालूंनीच राजकीय उत्तराधिकारी नेमले असताना त्यांनाच विरोध करायचा आणि लालूंच्या भेटी घ्यायच्या, यावरून विरोधी पक्ष अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अलीकडेच काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी तुरुंग प्रशासनाच्या परवानगीशिवाय लालूप्रसाद यांची भेट घेतली. त्यामुळे वादही निर्माण झाला होता. लालूप्रसाद यांना बिहारमधील संयुक्त जनता दल-भाजप युतीच्या विरोधात मजबूत आघाची उघडायची आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी करण्याची जबाबदारी आता लालूंनी खांद्यावर घेतली आहे. विरोधी पक्षांनी आता लालूप्रसाद घेतील, तो निर्णय मान्य करण्याची तयारी दाखविली. अन्य पक्षांचे नेते लालूप्रसाद यादव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सभेसाठी अनेक नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. लालूंना तुरुंगात कोणालाही भेटायला परवानगी नाही. तरीही लालूंच्या भेटीला अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. येथून निवडणुकीची रणनीतीही तयार केली जात आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांव्यतिरिक्त काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. तेथून बिहारमध्ये काय व्यूहनीती करायची, तिथे कोणत्या भागात कोणते उमेदवार द्यायचे, याची नीतीही ते करीत आहेत. दुसरीकडे समन्वय समिती नेमण्यासाठी वारंवार अल्टीमेटम देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आघाडीतील मतभेत तीव्र होत आहेत. समन्वय समितीची स्थापना होईपर्यंत माजी मुख्यमंत्री आणि हिंद आम मोर्चा या पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी विधानसभेसाठी कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक अवघी चार महिन्यांवर आली असताना विरोधी महागठबंधनात समन्वय समितीची स्थापना न केल्याने मांझी अजूनही संतप्त आहेत. गुरुवारी त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांना समन्वय समितीची स्थापना झाल्याशिवाय पुढील बोलणी होणार नसल्याचे स्पष्ट केले. मांझी यांनी महाआघाडीत समन्वय समितीची मागणी करीत आहेत. या समन्वय समितीने महागठबंधनचे नेते आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, महायुतीचा सर्वांत मोठा घटक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने याबाबत अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्री जनता दलाचा नेता तेजस्वी यादव हेच महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत, असे राष्ट्रीय जनता दलाचे म्हणणे आहे.

गोहिल हे गेल्या दोन दिवसांपासून पाटण्यात आहेत. पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी बुधवारी राबडी देवी आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. मांझी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. चहा पिण्याच्या उद्देशाने मांझी यांच्या घरी गेलेल्या गोहिलचे मांझी यांनी स्वागत केले; पण महागठबंधनमध्ये समन्वय समिती नसणे, ही महाआघाडीत सर्व काही ठीक नसल्याचे लक्षण आहे. मांझी यांनी गोहिल यांच्याशी बोलण्यासही नकार दिला. गोहिल यांनी मांझी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मांझी ऐकायलाच तयार नाहीत. समन्वय समिती तयार होईपर्यंत आपण कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. गोहिल यांनी घरात चार भांडी असली, तरी त्यांचा आवाज होतो. तो कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.

सर्वांना सरकारविरोधात एकत्र आणले जाईल, असे त्यांनी सांगितले असले, तरी त्याला किती यश येते, हे पाहायचे. तत्पूर्वी, गोहिल यांनी सदाकत आश्रमात विकास इन्सॅन पार्टी (व्हीआयपी) चे अध्यक्ष मुकेश सहनी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी)चे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनाही गोहिल भेटणार होते; पण कुशवाह दिल्लीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. महाआघाडीतील मतभेट मिटवण्यावर काँग्रेसने पुढाकार घेतला असताना तेजस्वी यादव मात्र त्यात कुठेही नाहीत. खरेतर ज्याला विधानसभेच्या निवडणुकीचा चेहरा व्हायचे आहे, त्यानेच सर्व विरोधकांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजवायला हवी; परंतु ते त्यात काहीच भूमिका घेत नाहीत आणि काँग्रेसने मात्र पुढाकार घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे महाआघाडीत बिहार विधानसभा निवडणूक काँग्रेसची सक्रियता वाढली आहे. तर तेजस्वी मात्र सक्रिय नाहीत. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी, पक्षांमधील समन्वय, सामायिक रणनीती आणि जागावाटप यासारख्या मुद्द्यांचा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. काँग्रेस (हिंदुस्थानी आम मोर्चा), राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) आणि विकास इंसान पार्टी (व्हीआयपी) या प्रमुख नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व मान्य होते; पण आता तेजस्वीच सर्वांशी संपर्क ठेवत नाही.
महागठबंधनात सर्व काही ठीक आहे असा जाहीरपणे दावा केला जात आहे आणि निवडणुकीच्या अधिसूचनापूर्वी सर्व विषयांचे निराकरण केले जाईल; परंतु काँग्रेसची वाढ अन्य पक्षांना ते मान्य होण्याची शक्यता दिसत नाही. कोणताही पक्ष युती करण्याचे नाकारत नाही; परंतु ती कोणत्या मुद्यावर करायची, यावर एकमत होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात थोडा तरी समन्वय आहे; परंतु अन्य घटक पक्षांत आणि जनता दलात नाही.

गोहिल यांच्या तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही डिनर डिप्लोमसीमुळे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही. जागावाटपाबाबत आपापसात चर्चा होऊ शकली नाही किंवा अन्य विषयांवरही चर्चा होऊ शकली नाही. उपेंद्र कुशवाह यांच्या सन्माननीय सहभागाबद्दलही कोणताही निर्णय होऊ शकला नाही.  अन्य घटकांच्या प्रमुख नेत्यांपासून तेजस्वी यांचे अंतर कायम आहे. ना मांझी, ना कुशवाह किंवा मुकेश सहनी भेटत नाहीत. युतीशी संबंधित सर्व गोष्टी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह करत आहेत. गेल्या आठवड्यात आरएलएसपीचे प्रदेशाध्यक्ष भुदेव चौधरी यांनी जगदानंद यांची भेट घेतली; परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. राष्ट्रीय जनता दलाने लोकसभेच्या निवडणुकीत वीस जागा लढविल्या, काँग्रेसने नऊ जागा लढविल्या. महागठबंधनातील फक्त काँग्रेसने एक जागा जिंकली. त्यामुळे त्यावर काँग्रेस आणखी काही जागांवर दावा करीत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा यशस्वीततेचा आलेख जास्त होता. त्यामुळे त्याने आता जास्त जागा मागितल्या आहेत. आता त्यातून कसा मार्ग काढायचा, यावर आता महागठबंधनचे भवितव्य अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here