प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि.११
कर्जत : ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची आषाढी वद्य एकादशीनिमित्त(कामीका एकादशी) भरणारी कर्जत येथील रथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कमिटी, मानकरी, पुजारी आणि प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्जत येथे प्रत्येक वर्षी आषाढ वद्य एकादशी दिवशी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांची रथ यात्रा भरते. या दिवशी श्री पांडुरंग कर्जतला येतात अशी आख्यायिका असून कौल मिळताच मूर्ती रथामध्ये ठेवून रथाची ग्राम प्रदक्षिणा केली जाते. यानिमित्त शहरामध्ये मोठी यात्रा भरते. यासाठी राज्यातून लाखो भाविक दरवर्षी कर्जतला येतात. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने अत्यंत कडक नियम करत सर्व धार्मिक उत्सवांना, कार्यक्रमांना, यात्रांना मनाई केलेली असून आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा ही होऊ शकलेली नाही. त्यामुळे कर्जतची रथ यात्रा भरेल की नाही ?याबाबत लोकांच्या मनात साशंकता होती.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.९) श्री गोदड महाराज मंदिर विश्वस्त, पंच कमिटी, पुजारी, मानकरी, मान्यवर पदाधिकारी, नगरपंचायतसह महसूल व पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी परंपरा कायम राखण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासनासमोर मांडल्या. मात्र, त्यास प्रशासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली नाही. अवघ्या पन्नास लोकांमध्ये रथ काढून तो रथ मार्गावर ग्रामप्रदक्षिणा करेल, यावेळी सॅनिटायझरचा वापर आणि सर्वांना मास्क घालण्यास बंधनकारक करण्यात येईल. यासह कोणालाही रथाजवळ येऊन दर्शन करू देणार नाहीत, गर्दी होणार नाही, रथ मार्गावर रथा ऐवजी पालखी काढू अशा विविध सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या. मात्र, प्रशासनाने यास कोणत्याही प्रकारे मान्यता न देता श्री गोदड महाराज यांची रथ यात्रा यंदा करता येणार नाही असे जाहीर केले.
या रथयात्रेच्या काळात तीन दिवस कर्जत परिसरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसीलदार नानासाहेब आगळे उपस्थित होते. या बैठकीस पंच कमिटीचे अध्यक्ष मेघराज पाटील, श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, आबा पाटील, सुरेश खिस्ती, प्रदीप पाटील, बप्पासाहेब धांडे, काका धांडे आदी उपस्थित होते. कर्जतची धार्मिक परंपरा असलेली व सर्वांना एकत्र आणणारी रथ यात्रा रद्दद झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.