गिडेगाव प्रकरण: चुलताच हल्लेखोर… पण का..?

1

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नेवासा फाटा : तालुक्यातील गिडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर नेवासा पोलिसांना यश आले असून या मुलीच्या चुलत्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने न्यायालयाने त्याला दि.16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण त्याने आपल्या पुतनीवर का हल्ला केला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गिडेगाव येथील अल्पवयीन शाळकरी मुलगी तिच्या राहत्या घरात एकटीच असताना अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराच्या साहाय्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.27 जून रोजी घडली होती. या घटनेने तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील जनमानस हादरून गेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नेवासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले. अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनीही हे प्रकरण गंभीर्याने घेऊन तपास प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेऊन होते.

या प्रकरणी गुन्ह्याची उकल होत नसल्याने विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी स्वतः गिडेगाव येथे धाव घेऊन घटनेचे बारकावे समजून घेऊन तपास पथकाला महत्वपूर्ण सूचना केल्या. त्याचा पुरेसा उपयोग होऊन सिंग यांनी भेट दिलेल्याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच खरा गुन्हेगार पोलिसांच्या नजरेत आला.

या मुलीचा चुलता असलेल्या या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चुलत्यानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने नेवासा पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एच. दाते करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here