ना चुडिया खनकी….ना बँड बजा… ना मेहंदीने रंग लाया….!

0

कोरोना लॉकडाऊन : बांगडी व मेहंदी बँड व्यावसायिकांची उपासमार

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राष्ट्र सह्याद्री 
 
कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे बांगडी व्यवसाय व हातावर मेहंदी काढणाऱ्या व बँड वाजवणाऱ्या कलाकारांची आर्थिक घडी पुरती विस्कटली आहे. लग्नसराई संपत आली तरी कोरोनाच्या लाँकडाऊनमुळे लग्न समारंभात यंदा…ना चुडिया खनकी… ना बँड बजा …ना मेहंदीने रंग लाया, असे चिञ यंदाच्या विवाहासमारंभात पहायला मिळत आहे.

कोरोनामुळे ज्याप्रमाणे मोठे व्यावसायिक अडचणीत आले. तसे लहान व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे लग्न समारंभास होणारी गर्दी ही केवळ 40 ते 50 माणसांपर्यंतच मर्यादित झाली. आता तर जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभात आता केवळ 20 माणसांना परवानगी दिली आहे. त्यामुळे लग्न समारंभाच्या आदल्यादिवशी होणाऱ्या हळदी कार्यक्रमाला फाटा बसला. त्यामुळे बांगडी व्यवसायासह हातावर मेहंदी काढणारे व बँड वाजविणारे कलाकार अडचणीत सापडले आहे.

विवाह समारंभात हिरवा चुडा हा महत्वाचा भाग असतो. हळद लावण्यापूर्वी वाजत गाजत सर्व देव देवतांना हळद वाहण्यात येते. तर हळदी नंतर मेहंदी हे विवाहसोहळ्यातील मुख्य आकर्षण असते. परंतू या वर्षी हे तीनही व्यवसाय यंदा पूर्णतः बुडाले आहेत. लग्न समारंभ म्हटला की,नातेवाईकांसह शेजारी आणि आजूबाजूला राहणाऱ्या महिलांना हिरवा चुडा घालण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही आहे. एका लग्न समारंभात पाच ते दहा हजार रुपयांच्या बांगड्यांची विक्री हमखास होत असते. लग्नाच्या दिवशी नवरदेवास वाजत गाजत देव देवतांच्या दर्शनासाठी नेले जाते. परंतू लॉकडाऊन काळात माञ मुक्या मुक्या नवरदेवास देव देवतांचे दर्शन घडवून मंडपदारी आणले जाते. त्यामुळे बँड कलाकारांची उपासमार होत आहे.

यावर्षी 40 ते 42 विवाह मुहूर्त होते. पण या मुहूर्तावर विवाह कुठं आणि कधी झाले. हे लॉकडाऊनमुळे लक्षातच आले नाही.अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

मेहंदी रंगलीच नाही…

“विवाह समारंभा म्हटला की मेहंदी हा अत्यंत महत्वाचा भाग मेहंदीत आता इन्स्टंट मेहंदीचे प्रकार आले असून पूर्वी मेहंदी अधिकाधिक रंगावी म्हणून त्यात कात टाकला जायचा. परंतू आता मेहंदी भिजवत बसण्यापेक्षा गल्लोगल्लीतील दुकानात मेहंदीचे कोन उपलब्ध होतात. नवरी मुलगी तसेच घरातील महिला व युवती वर्गात मेहंदीची मोठी क्रेझ आहे. नवरी मुलीच्या तर संपूर्ण हातावर व पायावर मेहंदी काढली जाते. त्यासाठी मेहंदी काढण्यात निष्णात असलेल्या कलाकरांना मेहंदी काढण्यासाठी एका लग्नात एक हजार रुपयापासून ते दहा ते बारा हजारा हजार रुपयांपर्यंत कमाई होते. मेहंदी म्हटल्यावर गाणी आणि राञीचे जागरण होऊन एक वेगळाच उत्साह असायचा कोरोनामुळे तो उत्साह यंदा दिसला नाही.”

“प्रत्येक लग्नसराईत हातावर मेहंदी काढताना शहरातील चार पाच जणांचा किमान लाखाच्यावर व्यवसाय होत होता. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदाही हातावर मेहंदी काढण्याचे काम मिळाले नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी काहीच काम राहिले नाही. म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी शोधावी लागत आहे.

– ताजीया नासिर तांबोळी, मेहंदी काढणारी व्यावसायिक देवळाली प्रवरा  ता.राहुरी

“बांगडी व्यवसायातून एका लग्न हंगामात एका लग्न समारंभात किमान पाच ते दहा हजार रुपयांच्या बांगड्याची विक्री होते. आठवड्यात चार लग्न समारंभ मिळाले तर 20 ते 40 हजार रुपयांच्या बांगड्यांची विक्री होत होती. परंतू सद्यस्थितीत लग्न कार्यात सगळ्याच गोष्टीला फाटा दिला जात असल्याने बांगडी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे ग्रामीण भागात लग्न हंगामात कोणी बांगड्या भरायला तयार नाही. त्यामुळे बांगडी व्यावसायिक आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत.

– भगवान भुमकर, बांगडी व्यावसायिक, देवळाली प्रवरा ता.राहुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here