Corona death : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व साहित्यिक नीला सत्यानारायण यांचे कोरोनामुळे निधन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व ज्येष्ठ साहित्यिक नीला सत्यानारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज गुरुवारी (दि.16) त्यांनी मुंबईतील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 

त्या 1972 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या. त्यांनी 37 वर्षे देशात विविध पदांवर सेवा दिली. निवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्त घोषित केले गेले. त्या राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. त्यांना साहित्यामध्ये प्रचंड रुची होती. त्यांनी आतापर्यंत 13 पुस्तकांचे लिखाण केले आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी रसिकांवर अमिट छाप सोडली.

त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा‘ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.

त्यांच्या निधनानंतर देशातील सर्वच उच्च पदस्थ अधिकारी तसेच राजकीय वर्तुळांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्याही त्या आतापर्यंत पहिल्याच आयएएस अधिकारी आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here