Beed : कोरोना रुग्णांसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात प्लाझ्मा दान

0
दोन गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी मदत
अंबेजोगाई – जिल्ह्यातील पहिली प्लाझ्मा थेरपी यंत्रणा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध झाल्यानंतर प्रशांत जोशी यांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान केल्याने दोन गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत मिळेल, असे स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ  वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  प्रशांत जोशीं यांनी आज प्लाझ्मा दान केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पालकमंत्री मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नुकतीच प्लाझ्मा थेरपी लॅब यशस्वीरीत्या सुरू झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा संकलित करून तो कोरोना बाधित असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो.
*अधिकाधिक दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन– अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख*
प्लाझ्मा दान करण्याचे दायित्व जोशी यांनी दाखवले आहे. हे पहिलेच प्लाझ्मा दान असून, कोरोनामुक्त झालेल्या अधिकाधिक सदृढ लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा, प्लाझ्मा थेरपी द्वारे कोरोना ग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे; असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.
यावेळी डॉ. देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. शिवाजी बिराटे, डॉ. चव्हाण, रक्तपेढीचे प्रभारी डॉ. विनय नाळपे, डॉ. आरती बर्गे, डॉ. नारायण पौळ, डॉ. सुजित तुमोड, जगदीश रामदासी, सय्यद मुश्ताक, किरण चव्हाण, परमेश्वर मोरे आदी उपस्थित होते.
स्वेच्छेने प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची २८ दिवसानंतर तपासणी करून प्लाझ्मा घेतला जातो, पुढील एक वर्षापर्यंत त्याद्वारे गंभीर कोरोना ग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार करता येतो.
*प्लाझ्मा दान केल्याचा आनंद – प्रशांत जोशी*
कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर आज प्लाझ्मा दान करताना मला आनंद होतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी प्लाझ्मा दान केला असून, आणखी कोरोनामुक्त झालेल्या बांधवांनीही पुढे येऊन प्लाझ्मा दान करत कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे प्रशांत जोशी यांनी म्हटले आहे.
*प्लाझ्मा दान करून पालकमंत्री धनंजय मुंडेंना शुभेच्छा*
प्रशांत जोशी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांनी कोरोनामुक्त होऊन २८ दिवस पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री श्री मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय प्लाझ्मा दान करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here