!!भास्करायण !! गरज निलक्रांतीची

0

भास्कर खंडागळे, बेलापूर [९८९०८४५५५१ ]

‘नेमिचि येतो पावसाळा’ याप्रमाणेच ‘नेमेचि साहतो दुष्काळ झळा,’ अशी आपल्या राज्याची स्थिती आहे. प्रत्येक दुष्काळाच्यावेळी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, सिंचन यावर चर्चा होते आणि पावसाळा सुरु झाला, की चर्चेवर पाणी फिरते! दुष्काळ कायमचा हटवायचा तर एका हरीतक्रांती व धवलक्रांतीप्रमाणेच आता निलक्रांतीची गरज आहे. भान राखून उपाय योजनांचा कृती आराखडा आखून, त्याची बेभानपणे अंमलबजावणी केल्यास अशी निलक्रांती सहज शक्य आहे. निलक्रांती पूर्णत्वास नेण्यासाठी उपाययोजनांचा कालबध्द कृती आराखडा बनविला पाहिजे. यात प्रामुख्याने नद्यांचे मुख्य खोरे आणि उपखोर्‍यांचा पाणलोट विकास करुन पाण्याची उपलब्धता वाढविणे, स्थानिक उपलब्ध पाण्याचे नियोजनासाठी एकात्मिक शिवार जलसंधारण आणि जलसंकल्प व जलवापराचा लेखाजोखा असे निलक्रांतीच्या कृती आराखड्याचे स्वरुप असावे.

निलक्रांतीचा कृती आराखडा बनविताना नद्यांचे खोरे व उपखोरे निहाय पाणी उपलब्धता, त्याचे नियोजन व पाणी उपलब्धतावाढीच्या उपाययोजनांचा अंतर्भाव असावा. प्रामुख्याने नद्यांच्या मुख्य खोर्‍यातील अतिरिक्त पाण्याचे अपुर्‍या पाणी उपलब्धतेच्या क्षेत्राकडे वळविणे, महापूराच्या स्थितीत नद्यांतून वाया जाणार्‍या पाण्याचे व्यवस्थापन, सह्याद्री व सातपुडा डोंगररांगाच्या माथ्यावरुन पलीकडे जाणारे पाण्याचे प्रवाह नद्यांच्या दिशेने वळविले, पश्‍चिम वाहिनी नद्यातून वाया जाणारे पाणी उचलून, अशा उपाययोजनांचा समावेश करता येईल.

सह्याद्रीच्या कुशीतील कोकणात सरासरी दोनशे इंच, सातपुडा पर्वताच्या परिसरात असलेल्या विदर्भात सरासरी शंभर इंच, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश भागात सरासरी कमाल चाळीस ते किमान पंधरा इंच पाऊस पडतो. कोकण खोर्‍यात सुमारे एक हजार टि.एम.सी., कृष्णा खोर्‍यात सव्वा सहाशे टी.एम.सी., गोदावरी खोर्‍यात सव्वा दोनशे टी.एम.सी., तापी खोर्‍यात शंभर टी.एम.सी. तर नर्मदा खोर्‍यात (महाराष्ट्रातील भाग) सत्तर टि.एम.सी. असे पाचही खोरे मिळून दोन हजार टि.एम.सी. पाणी उपलब्ध आहे. सदर उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव आणि आहे त्या पाण्याच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठीच्या उपायांचा दुष्काळ, हे खरे दुखणे आहे.

राज्यात कोकण, कृष्णा, गोदावरी, तापी व नर्मदा अशी पाच मुख्य खोरे आणि पंचवीस उपखोरे आहेत. कोकण नर्मदा व तापी खोर्‍यातील नद्या पश्‍चिम वाहिनी असून, कोकण व गुजरात राज्यातून अरबी समुद्रात जावून मिळतात. कृष्णा आणि गोदावरी या दोन खोर्‍यातील नद्या पश्‍चिम वाहिनी आहेत. कृष्णा व गोदावरी खोरे विस्तीर्ण असून सह्याद्री घाटमाथा ते सातपुड्या पर्यंत दक्षिण, उत्तर, पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भ असा प्रचंड भूप्रदेश या दोन खोर्‍यांनी व्यापला आहे. त्यामुळे या दोन खोर्‍यांचा जलविकास निर्णायक ठरतो.

कोकण खोर्‍यात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे आणि तितकाच पाण्याचा अपव्यय ही आहे. कोकण खोर्‍याचे योग्य पध्दतीने पाणी व्यवस्थापन केले, तर कृष्णा खोर्‍यात व गोदावरी खोर्‍याची पाण्याची उपलब्धता वाढविता येवू शकते. कोकणातील आणि सातपुडा पर्वत रांगातील वाया जाणारे पाणी कृष्णा, गोदावरी व तापी खोर्‍यात आणल्यास या खोर्‍यांची पाणी उपलब्धता वाढून राज्याच्या बहुतांश भागाचा पाणी प्रश्‍न सुटू शकतो. नर्मदा खोरे नंदूरबार जिल्ह्यापुरतेच मर्यादीत असले, तरी नर्मदा खोर्‍यातील पाणी उचलून, ते तापीच्या खोर्‍यात आणल्यास तापी खोर्‍याच्या पाणी क्षमतेत वाढ होवून खान्देशचा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल. याच पध्दतीने छत्तीसगढ, मध्यप्रदेशामधून विदर्भात येणार्‍या नद्यांची जलव्यवस्थापनाव्दारे तसेच सातपुड्याच्या पलिकडे वाया जाणारे पाणी उचलून पाणी उपलब्धता वाढविणे शक्य आहे. असे झाल्यास संपूर्ण विदर्भाच्या पाण्याची गरज पूर्ण होईल. अशातर्‍हेने पाच खोरे आणि त्यांच्या उपखोर्‍यातील पाण्याची उपलब्धता वाढविल्यास, दुष्काळाची ईडा-पिडा टळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here