जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्हाधिका-यांनी गंभीर दखल घेऊन कडक पावले उचलण्याची मागणी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढला आहे. बीड जिल्ह्यामध्ये 300 रुग्ण झाले असून काल गुरुवारी 25 कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्याला धसका लागलेला आहे. जिल्ह्यामध्ये काही भागात कंटेन्मेंट झोन संचारबंदी लागू असून तरीदेखील कोरोना रुग्णाचा आकडा वाढतच चालला आहे, त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा लॉकडाऊनची गरज पडणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासन सर्व तयारीनिशी रुग्णावर उपचार करीत आहेत. मात्र नागरिक प्रशासनाचे ऐकण्यास तयार नसून विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या जास्त आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाचा प्रसार झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. बँकेमध्ये सामाजिक अंतर न ठेवता मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये भाजी मार्केट, कपड्याचे मार्केट, यामध्ये लोकांची गर्दी दिसून येत आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते.
बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्याला आता मात्र लॉकडॉउन करण्याची गरज भासली असल्याचे वाटते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना बाबत गंभीर दखल घेऊन बीड जिल्हा कोरना मुक्त कशा पद्धतीने करता येईल याविषयी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.