पावसामुळे ऊस, कडब्याची विक्री घटली

0

जनावरांना चारा झाला मुबलक, फोनवरच चार्‍याची बुकिंग
नगर- जिल्ह्याच्या दक्षिण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गायी, म्हशी पालनातून दूध धंदा करतात. यासाठी दूध उत्पादकांंना जनावरांच्या चा-याची मोठी गरज भासते. गेल्या काही वर्षात अनेक वेळा दूध उत्पादक शेतक-यांना दुष्काळाशी मोठा सामना करावा लागला. यात जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी शेतक-यांची मोठी दमछाक झाली. यात मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागला. यासाठी मार्केटमधून किंवा शेतक-यांच्या थेट शेतातून जनावरांना चारा खरेदी करावा लागला. परंतु यंदा मे महिन्यातच पाऊस चांगला झाल्याने जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या चा-याला मागणी घटली आहे. कोरोनामुळे दोन महिने मार्केट बंद होते. यामुळे चारा विक्रीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या काळात मोबाईलवरुनच चा-याची खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. अनेक शेतकरीही चारा विक्रेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे शेतक-यांने संपर्क केला की चाजयाचे वाहन थेट उपलब्ध करुन दिले जात होते. सध्या बाजारात ऊस, मका, कडवळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पण मागणी नसल्याने भाव घटले आहेत. तर कडब्याची आवक कमी होत आहे. यंदा वर्षभर चा-याला मागणी कमी राहील, असे चारा विक्रेत्यांनी सांगितले.
चार्‍याचे भाव असे…
1)ऊस : 2000 ते 2500 रुपये टन
2)मका : 1500 ते 1600 रुपये टन
3)कडवळ : 1500 ते 1600 रुपये टन
4)कडबा : 1500 ते 1600 रुपये टन
(शेकड्यात कडबा बारीक साईज-800 ते 1000, मोठा कडबा-1500 ते 2000).
यंदा पाऊस पाणी चांगला झाला आहे. सर्वत्र जनावरांसाठी घरचा चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांकडे स्वत:चा कडबा देखील उपलब्ध आहे. -सुभाष देशमुख, पाथर्डी.

गेल्या दोन महिने कोरोनामुळे चारा विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु आता चारा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. पण, चा-याला मागणी नसल्याने भाव कमी आहेत. उसाची आवक मोठी आहे. कडब्याची आवक कमी आहे. त्यामुळे कडब्याचे भाव टिकून आहेत. -आप्पासाहेब बारसे, व्यापारी, अहमदनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here