प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर / सोनई: नगर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोनईतील एका डाॅक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता एक हजारांहून अधिक झाली आहे, तर कोरोनाग्रस्तांची संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार २५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णलयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत आज सकाळी आठ जणांचे अहवाल होकारात्मक आले. त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदे तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक, तर श्रीगोंदे तालुक्यातील चांडगाव एक, कोळगाव एक, अजनूज एक, देवदैठण एक आणि घारगाव येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
आज सकाळी ७५ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले. आज बाधित आढळलेल्या रुग्णासह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ झाली आहे. सोनईमध्ये हळूहळू कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. विळद येथील खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार घेत असलेल्या सोनई येथील एका ५५ वर्षीय डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यामुळे सोनईमध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेला. या मृत व्यक्तीची पत्नीदेखील बाधित असून ती याच रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोग्य खात्याने सोनईत टकार गल्ली, संतसेना गल्ली, संत सावता गल्ली येथे रँपीट अँटीजन चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती स्वतः नगर येथील खासगी रुग्णालयात चाचणीसाठी गेल्या. सोनईत बाधिताची संख्या आता ३१ झाली. ८२ जणांची चाचणी नकारात्मक आली. ३९ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.