प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – देशात सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने रोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दैनंदीन व्यवहार जरी काही प्रमाणात सुरू झाले असले तरी काही वंचित कुटुंबांवर अद्यापही उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती मिळताच संविधान प्रचारकांनी कोरो मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील सहा गावांतील एकूण ११८ कुटुंबांना ही मदत पोहचवली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे बऱ्याच अंशी संसर्गाचा वेग कमी करण्यात यश आले असले तरी या काळामध्ये हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, या काळात सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचली आणि भूकबळीचा धोका टळला.
सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानाच पशुधन खरेदी विक्रीचे आठवडे बाजार बंद असल्याने नव्याने या व्यवसायात आलेले लोक आज अडचणीत आले आहेत. खासकरुन आदिवासी पारधी समाजातील लोक स्वत:च्या मालकीची जमीन नसल्याने शेळ्या मेंढ्या शासकीय जमिनी व पडीक शेतामध्ये चारुन आपली उपजीविका भागवतात मात्र पशुधन खरेदी विक्रीचे आठवडे बाजार गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली होती.
ही बाब श्रीगोंदा तालुक्यातील संविधान प्रचारकांनी कोरो मुंबई या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली असता त्यांनी मदतीची तयारी दर्शवली.या मदतीतून श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला, लिंपणगाव, जोशीवस्ती, आर्वी, अनगरे, घोटवी व हिरडगाव या सहा गावांतील एकुण ११८ कुटुंबांना ही मदत मिळाली आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये संविधान प्रचारक प्रमोद काळे, सतीश ओहोळ, राजेंद्र राऊत, शिवाजी पोटे,दिगंबर काळे,मयुर भोसले, शुभांगी भोसले, नितीन चव्हाण,राहुल भोसले, विशाल भोसले, अविनाश चव्हाण यांनी गरजुंच्या याद्या तयार करुन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याचे काम केले.