प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
मुंबई : राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दुधाला कमी दर दिले जात असल्याच्या तक्रारी बाबत चर्चा करण्यासाठी राज्याच्या दुग्ध विकास मंत्रालयाने उद्या (दि. २१) बैठकीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव राजेश गोविल यांनी यासंदर्भात बैठकीची सूचना दिली.
या बैठकीला राज्याचे माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, कार्याध्यक्ष दीपक भोसले, किसान क्रांती मोर्चा चे समन्वयक संदीप गिड्डे, राज्य सुकाणू समितीचे सदस्य पारनेर येथील अनिल देठे, अकोले येथील रोहिदास धुमाळ, औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव येथील शेतकरी प्रतिनिधी धनंजय धोर्डे, राहुरी येथील मधुकर म्हसे, कराड येथील पंजाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत त्यांना राज्य शासनाच्या वतीने बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.
कोरोनाविषाणूचा प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद झाल्यानंतर राज्यात दुधाची मागणी प्रचंड घटली. मागणी कमी झाल्याने दूध संघांनी दुधाला कमी दर देण्यास सुरुवात केली. लिटरमागे दहा ते बारा रुपये कमी दर मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही कोणी त्याची दखल घ्यायला तयार नव्हते.
दरम्यान, ‘राष्ट्र सह्याद्री’ने यासंदर्भात ‘गर्जना’ या सदरातून आवाज उठवला. त्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी राज्य शासनाकडे दूध दरा संदर्भात पाठपुरावा सुरू केला.
आता दुग्धविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेतला जावा, दुधाला वाढीव दर मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.