Breaking News : शिवसेना नेते सदा कराड यांच्यावर बिबट्याचा हल्ला  

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वडाळा महादेव : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव अशोक नगर फाटा परिसरातील रेल्वे चौकी समोर पाटाच्या कडेला नेहमी वाहनांची वर्दळ सुरू होती. अशोक नगर कारखाना येथून सदाशिव कराड हे आपल्या दुचाकीवरून जात असताना उसाच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत कराड यांच्या हाताला चावा घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखत कराड यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पाटातून तेथून पोबारा केला.
तालुक्यातील उक्कलगाव,गळणीब, पढेगाव येथे बिबट्याने अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून अनेक जनावरांसह, मानवावरही हल्ला केला आहे. याच बिबट्याने दोन दिवसापूर्वी एका लहान तीन वर्षाच्या बालकाला घरासमोरून अंगातून ओढण्याचा प्रयत्न केला होता. महिलेच्या दक्षतेने बिबट्याच्या तावडीतून मुलगा बचावला आहे. तसेच काल रात्री येथील जोशी वस्तीवरील वायकर यांच्या गाईचा बिबट्याने कान तोडला आहे. तसेच खडी क्रेशर खाणीच्या परिसरात एका शेळीवरही बिबट्याने हल्ला केला आहे.
कराड यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यानुसार ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.  यावेळेस नागरिकांमधून वन विभागाचे अधिकारी यांना मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. त्यानुसार घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी एस एम लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती कळवली. त्यानुसार नागरिकांना परिसरात पिंजरा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले.
सदाशिव कराड यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय शिरसगाव हलवण्यात आले. त्यानुसार तेथे प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलवण्याची माहिती देण्यात आली. परिसरातील नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशोक नगर फाटा निपाणी वडगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसत आहे. याठिकाणी लपण्यासाठी मोठी जागा उपलब्ध असून उसाचे मोठे क्षेत्र आहे.
यासंदर्भात गणेश सदाशिव कराड, रवींद्र पवार, शरद देवकर, गंगाधर देसाई, चांगदेव देसाई, चंद्रकांत मोरकर, संपतराव देसाई बाळासाहेब सुलताने, रवींद्र सुलताने, दादासाहेब देसाई आदी परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांनी परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here