Shrigonda : विक्रमी ऊस उत्पादन घेणा-या सभासदांना ‘नागवडे’ देणार पुरस्कार – राजेंद्र नागवडे

0

जिल्हा बँकेच्या सुलभ व कमी व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – शेतक-यांनी एकरी उत्पादनवाढीवर भर द्यावा यासाठी ‘नागवडे’ कायखान्याने पुढाकार घेतला आहे. ऊसाचे दर एकरी सर्वाधिक उत्पादन घेणा-या शेतक-यांना दरवर्षी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु करण्याचा निर्णय ‘नागवडे’च्या व्यवस्थापनाने घेतला असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना नागवडे म्हणाले की, शेती व शेतकरी हिताचा विचार करुन ‘नागवडे’चे व्यवस्थापन सभासद हिताचा कारभार करीत आहे. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव नागवडे यांची शिकवण व आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘नागवडे’च्या व्यवस्थापनाने शेतकरी हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.’नागवडे’च्या कार्यक्षेत्रातील एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी दरवर्षी सुरु,आडसाली, खोडवा या प्रकारात सर्वाधिक ऊस उत्पादन काढणा-या प्रत्येकी तीन सभासदांना अनुक्रमे वीस हजार रुपये, दहा हजार रुपये व पाच हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, ज्या सभासदांना कारखान्याच्या योजनेत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी कारखान्याच्या शेतकी विभागात संपर्क साधावा.
कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करुन नागवडे म्हणाले की,मागील वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चा-यासाठी तुटलेल्या ऊसाची चारा खोडवा म्हणून नोंद घेऊन यावर्षीच्या हंगामात या चारा खोडवा ऊसाच्या तोडीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रातील आडसाली ऊसाबरोबर या चारा खोडव्याची ऊस तोडणी करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘नागवडे’च्या व्यवस्थापनाने घेतला आहे. ज्या शेतक-यांकडे चारा खोडवा ऊस ऊभा आहे. त्यांनी कारखान्याचे शेतकी विभागात या ऊसाची नोंद करावी, असे आवाहन करुन ते म्हणाले की, ‘नागवडे’च्या सभासद व कार्यक्षेत्रातील शेतक-यांना ऊसाचे अधिक उत्पादन देणा-या चांगल्या वाणांच्या ऊस रोपांची उपलब्धता कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही व्यवस्थापनाने घेतला असून प्रायोगिक तत्वावर त्यासाठी रोपवाटिका ऊभारण्यात येणार, आहे अशी माहिती त्यांनी दिली.
शेतक-यांनी एकरी उत्पादन वाढविल्याशिवाय किफायतशीर शेती करणे शक्य नाही म्हणून जिल्हा बँकेने शेतक-यांसाठी कमी व्याजदराच्या नव्या कर्ज योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतक-यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने कर्ज, वर्ग-2 चे जमीनीवर कर्ज वितरण, याशिवाय पशुपालन, पक्षीपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी-मेंढी पालन करीता खेळते भांडवली कर्ज केवळ 2 टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या या सुलभ कर्ज योजनांचा लाभ घेऊन शेतक-यांनी अधिकाधिक उत्पादन घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहनही नागवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here