प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५
कर्जत : कर्जत तालुक्यात शनिवारी तीन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या ३४ झाली आहे, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. मागील आठवड्यापासून कर्जत तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात तब्बल चार कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शनिवार दि २५ रोजी कर्जत तालुक्यात तीन जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या तब्बल ३४ झाली आहे. यापैकी ६ कोरोना बाधित रुग्ण कर्जत शहरातील आहे. तर उर्वरीत २८ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शनिवारी निंबोडी, राशीन आणि थेरवडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे. तर मिरजगाव येथील ५३ वर्षाच्या व्यक्तीचा उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आजतागायत कर्जत तालुक्यातील एकूण चार रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अजून ३२ व्यक्तीचे कोरोना अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. दिवसा-दिवस कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे नागरिकांनी टाळावे. यासह अत्यावश्यक काम असल्यास तोंडास मास्क, हातास सॅनिटायजरचा वापर करावा. यासह गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतरपथ्याचे नियम पुरेपूर पाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या वतीने घरोघरी आरोग्य तपासणी
शहरात कोरोनाबाधित ६ रुग्ण आढळल्याने तालुका आरोग्य विभागाच्या मदतीस कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी धावले असून गुरुवारपासून प्रत्येक प्रभागनिहाय घरोघरी जात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. यामध्ये शारीरिक तापमान, ऑक्सिजन चाचणी, प्लस तपासणी केली जात असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन कर्जत नगरपंचायतीद्वारे करण्यात आले आहे.