भेटीने वाढविला कोरोना संपर्क
करजगांव : नेवासा तालुक्यातील करजगांव येथिल तामतळे वस्तीवरील एका पाॅझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील कुटुबांतीलच पाच व्यक्तीना कोरोना संक्रमणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने करजगावकरांची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी संपर्कातील 22 व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते.
यामध्ये सदर रूग्णाची पत्नी, चुलत सासू, मुलगी, पुतण्या व नातीचा सामावेश आहे. करजगावमधील रूग्णाची संख्या सात झाली. पहिला एक रूग्ण बरा झाल्याने घरी आला आहे. आज पॉझिटीव आलेल्या या पाच रूग्णांना नेवासा येथिल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.
शुक्रवार सकाळीच तहसिलदार रूपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सुर्यवंशी, सोनई प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कसबे यांनी सदर वस्तीला भेट देत तेथिल परिस्थितीचा आढावा घेतला होता.
या रूग्णाच्या संपर्कातील 22 व्यक्तीचे शुक्रवारी स्वॅब नेवासे येथिल कोविड सेंटर मध्ये घेण्यात आले होते.त्यापैकी पाच पॉझीटिव आल्याने करजगावकरांची धाकधुकी वाढल्याने मुळाकाठही चिंताग्रस्त झाला आहे.बाकीच्या 17 व्यक्तींचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचे आरोग्यविभागाकडुन सांगण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्य सेवक आर.आर. पोटोळे, आरोग्य सेवक जनार्धन दिवटे, आरोग्य समुदेशक आव्हाड, मदतनिस मीना गायकवाड, आशा सेविका मीना झिंझार्डे, निकीता भोपळे यांनी कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील शोध घेत असून संपूर्ण वस्तीवरील सर्वेक्षण करत आहे. यावेळी उपसरपंच अशोकराव टेमक उपस्थित होते.
भेटीमुळे वाढला संपर्क
सदर रूग्ण गुरूवारी घरी आल्यावर शुक्रवारी पॉझिटिव अहवाल आला.सदर व्यक्ती अपघातग्रस्त असल्यामुळे पुर्ण वस्तीच भेटण्यासाठी गेली होती.मात्र शुक्रवारी सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आल्याने धोका वाढण्याची शक्यता होती.यामुळे भेटीने धोका वाढला असुन 17अहवाल येणे बाकी असल्यामुळे कुणाचीही भेट नको,असा मार्ग करजगावकरांनी अवलंबलिला आहे.