प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शांत, संयमी, मृदुभाषी, आणि खंबीर अशी प्रतिमा असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी अनेक कार्यकर्ते व मित्रमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2003 मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर आतापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच त्यांची प्रतिमा उंचावणारा ठरला आहे. या पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अनेक यशापयशांचा सामना करावा लागला. फक्त शिवसेनेतीलच एका गटाविरोधात नव्हे तर कुटुंबातूनही त्यांना संघर्ष होता.
उद्धव ठाकरे हे अतिशय उत्तम फोटोग्राफर आहेत. आजही वेळ मिळाला तर ते फोटोग्राफी करतात. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी ते सामनाचे काम पाहायचे तसेच आपल्या फोटोग्राफीचा छंद जोपासायचे. उग्र राजकारण त्यांना आवडत नाही. शांत, संयमी आणि मितभाषी असल्याने त्यांना सुरुवातीला अनेक जणांचा विरोध सहन करावा लागला.
मात्र, या सगळ्यांवर मात करीत एक-एका क्षेत्रावर आपली पकड मजबूत बनवत त्यांनी आपली दिशा ठरवली. याकाळात त्यांनी शिवसेनेचेही स्वरूप बदलले. शिवसेना ही हिंदूत्ववादाकडून आता सर्वधर्म समभावाकडे वळली. तसेच उत्तर भारतीयांबाबतही त्यांची भूमिका बदलली आहे.
मुख्यमंत्री बनल्यानंतर गेल्या 8 महिन्यात त्यांच्यासमोर कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे राहिले. या दोन्ही संकटांना ते मोठ्या धीराने सामोरे जात आहेत. तर गरीबांना पाच रुपयांत शिवभोजन ही त्यांची महत्वाकांक्षी योजना ज्यापद्धतीने ते राबवित आहेत ते उल्लेखनिय आहे. शिवभोजनमुळे अनेक गरिबांना किमान एक वेळ तरी चांगले जेवण अवघ्या 5 रुपयात भेटत आहे.
पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा : मुख्यमंत्री
यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कार्यालक किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नता. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. तसंच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.