Newasa: सहकारातील स्वाहाकार: कुकण्यातील भाऊसाहेब देशमुख सहकारी संस्थेत कोट्यवधींचे गौडबंगाल..!

0

सहकार खात्याच्या चौकशीत उघडकीस; कारवाईची शिफारस

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर: सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या शेती व ग्रामीण विकासासाठी संजिवनी मानल्या जातात. या संस्थांमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळते; मात्र अशा संस्था जेव्हा चुकीच्या व्यक्तींच्या हाती जातात, तेव्हा गैरकारभारामुळे या संस्थांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. सामान्य शेतकरी सभासदांना त्यामुळे फटका बसतो. असाच एक प्रकार नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील भाऊसाहेब देशमुख सहकारी संस्थेत झाल्याचे नुकतेच सहकार खात्याने केलेल्या चौकशीत उघडकीस आले आहे.

स्व. भाऊसाहेब देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही नेवासा तालुक्यातील एक नावाजलेली सहकारी संस्था आहे. या संस्थेची सहकार कायद्यातील कलम 83 अन्वये नुकतीच चौकशी झाली. सहकार खात्यातील वर्ग 2 चे अधिकारी लेखापरीक्षक पंडित आरणे यांनी तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत ही चौकशी केली. सन 2015 ते 2019 या कालावधीत संस्थेच्या संचालक मंडळासह सचिव यांनी केलेल्या कारभारावर या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत.

अहवालात प्रामुख्याने गेल्या चार वर्षात केवळ व्याज भरणा रकमेत 50 लाख 75 हजारांची तफावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संस्था अनिष्ट तफावत आणि तोट्यात असताना गेल्या चार वर्षात 22 शीर्षकावर सुमारे 80 लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. या काळातील संचित तोटा 3 कोटी 80 लाख तर अनिष्ट तफावत 4 कोटी 77 लाख इतकी आहे. अशा स्थितीत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी 1 लाख 33 हजार रुपये ऍडव्हान्स बेकायदेशीरपणे वापरला असल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम वसूल पात्र असल्याचे मत चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. यासह खर्चाचे नियम न पाळणे व्यापारी तत्त्वाचे पालन न करणे अशा चुका त्यावेळी संचालक मंडळांनी केल्या आहेत.

चौकशी अधिकारी आरणे यांनी हा अहवाल नेवासा येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर केला आहे आता सहकार खाते या प्रकरणी काय कारवाई करते याकडे सहकार क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here