दोन मित्रांची ध्वनिफित व्हायरल
कोल्हापूरच्या मुसळे येथील कोरोना कक्षात मोठ्या सुविधा मिळतात त्यामुळे आता एक दोन महिने बाहेर येण्याची इच्छाच नाही, असे एक मित्र दुस-या मित्राला सांगत असल्याची ध्वनिफित व्हायरल झाली आहे. सोबतच येथे दाखल होणा-या सरसकट सगळ्यांचेच अहवाल पॉझिटिव्ह येतात, असे आक्षेपार्ह विधान देखील यामध्ये ऐकायला मिळत आहे. सध्या या ध्वनिफितीची चांगलीच चर्चा कोल्हापूरात रंगली आहे.
कोल्हापूरच्या आयजीएम रुग्णालयातील कोरोना सेंटरमधील एका रुग्णाने दुस-या एका मित्राला फोन करून सेंटरमधील माहिती दिली. यावेळी रुग्णालयातील सुविधांबरोबरच काही आक्षेपार्ह विधानेही यात करण्यात आली आहे.
दिवाळीला कपडे घेऊनच बाहेर येतो आता
या संभाषणात मित्राने कधी बाहेर येणार असं विचारला असता, याठिकाणी एक नंबर चंगळ सुरू आहे. दोन वेळ नाश्ता, दूध, जेवण सगळं काही निवांत मिळतं. आता दोन-तीन महिने बाहेर येणारच नाही. थेट दिवाळीला नवीन कपडे घेऊनच बाहेर येतो. अशा पद्धतीचं वक्तव्य देखील या भाषणांमधून बाहेर आलं आहे.
दीड लाखाचा निधी मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण दाखवण्यात येत असल्याचं वक्तव्यही करण्यात आलं आहे. त्यामुळे या ध्वनिफितीबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून दोघांचा शोध सुरू आहे. तसेच हेतूपुरस्पर रुग्णालयाची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे होत आहे का याचा शोध घेतला जात आहे.