लातूर ः लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. लातूर शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने डॉक्टरांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
एका वद्ध महिलेचं बुधवारी पहाटे या रूग्णालयात निधन झालं. डॉक्टर दिनेश वर्मा रात्री दोन वाजेपर्यंत रुग्णालयात होते. पहाटे पुन्हा त्यांनी कामाला सुरु केली. सकाळी सात वाजेच्या दरम्यान तिसर्या मजल्यावर काही लोकं उभी असलेली त्यांना दिसली. त्यापैकी दोन-तीन जणांच्या तोंडाला मास्क नव्हता, यामुळे डॉक्टरांनी त्यांना हटकलं. त्यातील एकाने आईचे निधन झालं असून मी नाराज असल्याचं’ सांगत तो डॉक्टरांना वाटेल ते बोलू लागला. यावर डॉक्टरांनी त्यांना तुम्ही तोंडाला मास्क लावून या, आपण बोलू असं सांगितलं.
यानंतर लिफ्टमध्ये त्यांच्यासोबत तिघेजण आले दरम्यान डॉक्टर कोविड विभागाकडे जात असताना, त्यातील एकाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्याराने डॉक्टरच्या छातीवर, गळ्याच्या खालच्या बाजूला तसंच हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाले. सुदैवाने डॉक्टरांसोबत असलेल्या लोकांनी त्यांना धरून ठेवले आणि त्यानंतर डॉक्टरांनी दुसर्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीतही डॉक्टरांवर होणारे हल्ले काही थांबायचं नाव घेत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात या घटनेचे गंभीर पडसाद उमटलेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी अशा घटनेमुळे डॉक्टरांचे मनोबल खचत असल्याचं सांगत, कोरोनाबाधितांवर उपचार करणार्या खासगी रुग्णालयांना चोवीस तास पोलीस संरक्षण मिळण्याबाबत मागणी केली आहे.