मालेगाव – तालुक्यातील 1669 अतिक्रमणधारकांना स्वतःच्या नावाने मिळकत नोंदीचे उतारे मिळणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लवकरच हे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
तालुक्यात साधारण दहा हजारहून जास्त निवासी अतिक्रमणधारक आहेत. यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी दादा भुसे यांनी सन 2005 पासून पाठपुरावा केला होता. जेथे सन 2011 पूर्वीचे शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण होते ते कायम करण्याबाबतचे पुरावे शासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतींच्या मार्फत भरण्यात आले होते. आता 1669 निवासी अतिक्रमण कायम करण्यात आले आहेत. उर्वरित अतिक्रमण कायम करण्यासाठी तालुकास्तरावर शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यांचे निवासी अतिक्रमण मंजुर झालेले नाही त्यांनी ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करुन आपले प्रकरण समितीकडे ग्रामपंचायतीमार्फत सादर करावेत, असेही दादा भुसे यांनी सांगितले.