प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील अभिलाष बाळासाहेब महाडिक यांना केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत असताना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे 9 जुलै 1983 रोजी अभिलाष बाळासाहेब महाडिक यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडील बाळासाहेब व आई कलावंती पहिल्यापासूनच अत्यंत कष्टाळू व मेहनती होते. त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची खून गाठ मनाशी बांधली होती. त्यातच अभिलाषला बालपणापासून सैन्य दलाचे आकर्षण. त्यातच जन्मजातच उत्तम शारीरिक व्यक्तीमत्व लाभलेल्या या तरुणाने उक्कडगावातील मुंजाबा विद्यालयात विद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच पुढील शिक्षणासाठी शिरुर येथील चांदमल ताराचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. जाणीवपूर्वक महाविद्यालयीन जीवनात सैन्य दलातील भरतीसाठी प्रयत्न करु लागला.
घरच्यांना शेतात मदत करत विकास महाडीक या लहान भावाला साथ करत महाविद्यालयीन अभ्यास करतानाच शारीरिक कसरत करत तो कसोशीने सैन्य दलातील भरतीचे प्रयत्न करु लागला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच 2004 मध्ये तो केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाला. मध्यप्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जुलै 2005 रोजी सेवाबजावण्यासाठी जम्मु-काश्मीरमधील पेहलगाव या ठिकाणी दाखल झाला तेव्हापासून आजपर्यंत ते अविरतपणे सेवा बजावत आहेत.
दरम्यान, काळात म्हणजेच 2007 मध्ये उक्कडगावातीलच भिमक कातोरे यांच्या कन्या मनिषा यांच्याशी विवाह संपन्न झाला. सध्या तो मुंबई येथे कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत कसोशीने सेवा बजावत आहे. त्यांना आतापर्यंत कठिण सेवा पदक, आंत्रिक सेवा पदक, दोन वेळा प्रशंसा पत्रक व 2020 मध्ये त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या या विशेष यशाबद्दल त्यांचे महाडीक परिवार व उक्कडगाव ग्रामस्थासह सह संबध श्रीगोंदेकराकडून तसेच सैन्य दलातील अधिकारी वर्गाकडून कौतुक होत आहे. सैन्य दलातील पुढील यशस्वी वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा.