भास्कर खंडागळे,बेलापूर (९८९०८४५५५१ )
सिनेमा हे नुसतं करमणुकीचा विषय नाही. काही सिनेमा, त्याची कथा, त्यातील आशयघन गाणी प्रेरणा देतात. असाच अनोखी रात नावाचा चिञपट १९६८साली आला. त्यातील “ओहरे ताल मिले नदी के जल मे…” हे मधूर व आशयपूर्ण गीत. गीतकार इंदिवर यांचे साधे पण अथांग आशयाचे बोल स्व. मुकेश यांचा मुलायम आवाज आणि स्व.रोशन (संगीतकार राजेश रोशन व निर्माते दिग्दर्शक राकेश रोशनचे वडील) यांचे कर्णमधुर संगीत, असा अनोखा संगम या गाण्यात झाला आहे.
वरवर बघता हे गाणे साधेसुधे वाटते ते या गाण्याच्या गेयतेमुळे आणि सोपी ताल व लय यामुळे. पण खोलात शिरलं तर ऐकणारा आशयाच्या भोव-यात अडकत जातो. मग ठाव लागतो आशयघन जीवनगिताचा!
गाण्याची सुरुवात “ओहरे ताल मिले
नदिके जलको
नदी मिले सागरको
सागर मिले कौनसे जलको
कोई जाने ना…….”
पावसाळा सुरु झाला की डोंगर कपारीतून पाण्याचे ओहळ,प्रपात झेपावतात.त्यांचे ओढ्यानाल्यात रुपांतर होते. हे ओढेनाले खाळाळत नदीला जावून मिळतात. हे सगळं घेऊन आणि लेऊन नदी एखाद्या प्रेयसीसारखी आतुरतेने सागराकडे झेपावते. सागराशी एकरुप होते. पण सागागराचं जल माञ कशाला जाऊन मिळते? ये कोई जाने ना…
आता याचा जीवनाशी अर्थ लावा. आपण एकटे जन्माला येतो. मग आई, बाप, भाऊ, बाहिण, गणगोत, मिञ, सखे सोबती येऊन मिळतात आणि आपण नदी बनतो. अखेरिस भवसागराला जाऊन मिळतो. पण या भवसागराच्या पुढे काय?कोणालाच ठाऊक नाही.
“सूरज को धरती तरसे
धरती को चंद्रमा
पानी मे सिप जैसे
प्यासी हर आत्मा,
ओ मितवा रे…..
बूँद छुपी किस बादल मे
कोई जाने ना…..”
वसूंधरा सूर्याच्या किरणांसाठी ञस्त. तर चंद्राला वसुंधरेची आस. पाण्यात राहूनही शिंपलं आतून तहानलेलंच राहातं. हे सख्या, पाण्याचा थेंब कोणात्या नभात हे
कोणालाच ठाऊक नसतं……!!
याचा मतितार्थ, माणसाला नात्याची ओढ असते. नाते प्रेमासाठी अतुर असते. पण समूहातही माणूस एकाकी असतो, तहानलेला असतो त्या पाण्यातल्या शिंपल्यासारखा. कारण प्रेम कशात दडलंय?
ये कोई जाने ना….
येथे प्रेमाचा शोध आणि बोध होतो.पुढे कवी म्हणतो….
“अन्जाने होठो पर क्यूँ
पहेचाने गीत है
कल तक जो बेगाने थे
जनमो के मीत है
ओ मितवा रे…
क्या होगा कौनसे पल मे?
कोई जाने ना……!!”
अपरिचित ओठांवर परिचित गीत कसे? कालपर्यंत आनोळखी असतात तयाशी जन्माचे नाते कसे जडते? काय होईल कोणत्या क्षणी….?सगळंच गूढ आणि अज्ञात!!
माणूस एकटाच येतो. पण मग त्याचा अनोळख्यांशी परिचय होतो. जसे आपण सुरुवातीला अनोळखी असतो. मग मैञीच्या, नात्यांच्या, बंधनाच्या माध्यमातून अपरियाचे अपार परिचित झालो. जन्मजन्मीचे नाते जडले. अनोळखी ओठांशी प्रित जडली. हे कसे? तरीही कोणत्या घडीला काय होईल….कोणालाच, ज्ञात नाही,याला जीवन ऐसे नाव!!!!!
नाखवा या लोकगीत प्रकाराशी मिळंजुळतं गीत. वर्णन निसर्गाचं पण शोध मानवी गूढ जीवनाचा. ओ, हा है रे है रे कोरसने गाणे सुरु होते. नदीच्या किनारी असलेल्या गाडीरस्त्याने बैलगाडीत(तट्यात) संजीवकुमार, जा हिदा, मुक्री यांचा प्रवास. अभिनयाचे विद्यापीठ असणा-या स्व.संजीवकुमारचा निरागस, नितळ, निर्मळ मुद्राभिनय. कुठलाही तांञिक बडेजाव नसलेलं सुरेख चिञिकरण. सोबतीला निसर्गाची निरव शांतता आणि रोशनजी यांच्या संगीतातील कर्णमधूर बासरीची सुरावट, गाडीच्या तालावर घुंगरे, पैजणाचा नाद..जणू आपणच बैलगाडीतून प्रवासतोय, अशी अनुभती देणारं. आ हा हा… केवळ अवर्णनिय ! गूढ जीवनप्रवासाचे अवर्णनीय वर्णन!!!!