प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना विषाणूच्या साथीने आता मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले असून काल कोपरगाव शहरात १६ रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळी पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून काल १० संशयित रुग्णांचे अहवाल नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते त्यातील ७ निरंक आले असून ३ बाधित आले आहे. त्यात एक राम मंदिर रोड येथील ३५ वर्षीय महिला तर लक्ष्मीनगर येथील एक ३५ वर्षीय महिला आणि सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ४२ वर्षीय महिला बाधित आढळल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. ही सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांची वाढ नोंदवली गेली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, काल दिवसभरात १६ रुग्ण बाधित आढळले होते. त्यात ५८ संशयित नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात तब्बल १६ जण कोरोना बाधित निघाले होते. त्यात कोपरगाव शहरात मोठी रुग्ण संख्या आढळून आली होती. त्यात स्वामी समर्थनगर येथील १० रुग्ण आढळले होते. त्यात सहा पुरुष (वय वर्ष-८,३७,४५,३३,७९ वर्षांचा समावेश) तर चार महिलांचा त्यात (वय वर्ष- १७,३६,४०,३०) समावेश होता. तर शिंदे-शिंगी नगर येथील एक १४ वर्षीय मुलगी बाधित आढळली होती. त्या खालोखाल सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या रुग्णाच्या घरातील तीन रुग्ण आढळले होते.(त्यात एक पुरुष वय-४५ वर्ष,एक ६० वर्षीय महिला,व एक २० वर्षीय महिला यांचा समावेश होता) या खेरीज कोपरगाव बेट येथील एक वीस वर्षीय तरुण व डाऊच खुर्द येथे एक कोरोना बाधित आढळला होता.
काल सर्वाधिक १६ रुग्ण वाढल्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे नागरिकांत या साथीची भीती वाढली आहे. त्यानंतर आज सकाळीच सहा वाजेच्या सुमारास डॉ.फुलसुंदर यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. आज कोपरगाव शहरात संचारबंदी तालुका प्रशासनाने जाहीर केलेली आहे. उद्या बकरी ईद असल्याने आज मुस्लिम बांधवाच्या सोयीसाठी हा बदल केलेला आहे. आता आज नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढ ही खूपच चिंतेची बाब कोपरगावकरांसाठीं निर्माण झाली आहे.