प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र जैन | कडा
कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची नव्हे तर जिद्द, चिकाटी अन् आत्मविश्वासाची गरज असते. हेच वडिलांचं छत्र हरपलेल्या वैष्णवी शाम कोकाटे नावाच्या कन्येने दाखवून दिले आहे. नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला असून या परिक्षेत वैष्णवीने ९०.२०% गुण मिळविले आहेत. मात्र घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाचा प्रश्न तिच्यासाठी आव्हान बनला आहे.
आष्टी येथील गणेश विद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी शाम कोकाटे हीने हलाकीच्या परिस्थितीवर मात करुन जिद्द, चिकाटीच्या बळावर इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९०.२०% गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. परंतू म्हणतात ना… नियतीपुढे कुणाचं काहीच चालत नाही. चार वर्षापूर्वी या छोट्या कुटुंबाला दृष्ट लागली. अन् नियतीला यांचं सुख पाहावले नाही. अगोदरच परिस्थिती बेताची अन् त्यातच वडिलांचे छत्र हरपलं. त्यामुळे अचानक सर्व कुटूंबाची जबाबदारी आईच्या अंगावर येऊन पडली. वैष्णवीची आई मिराबाई श्रीपती नजान या तहसील कार्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तोकड्या पगारावर दोन मुलांचं संभाळ करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या माऊलीसाठी आव्हान बनले आहे. अशाही कठीण परिस्थितीत वैष्णवीने हतबल न होता.
आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. शाळेतून घरी आल्यावर ती आईला घरकामात मदत करुन रात्री दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास करीत तिने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन शाळेचा नावलौकिक वाढवला. डाॅक्टर होण्याचं वैष्णवीचं स्वप्न असलं तरी पुढील शिक्षण अधांतरी राहू नये. यासाठी तिला मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील कर्ण वृत्तीच्या दानशूर व्यक्तींसह सामाजिक संस्थांनी अशा निराधार प्रज्ञावंतांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
मला डाॅक्टर व्हायचंय …
हलाकीच्या परिस्थितीवर मात करुन जिद्द, चिकाटीच्या बळावर वैष्णवीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९०.२०% गुण मिळवले असले तरी भविष्य अधांतरी आहे. त्यामुळे पुढील शिक्षण तिच्यासाठी आव्हान बनले आहे. त्यामुळे तिचं डाॅक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी वैष्णवीला समाजातील दानशुरांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे