Human Interest : समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी ‘तिला’ बनायचय फौजदार

1
आदिवासी पारधी समाजातील भाग्यश्री भोसले हीचा संकल्प

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पारधी समाजामध्ये जन्माला येणे म्हणजे गुन्हेगार असणं हा समाजाचा भ्रम दूर करण्यासाठी मला फौजदार बनायचं असा संकल्प आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थीनी भाग्यश्री भोसले हीने केला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये भाग्यश्रीने ७९%  गुण मिळवले याबद्दल तीचा लोकशिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तीने आपल्या भावनांना बगल करुन दिली.
यावेळी बोलताना ती पुढे म्हणाली की अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात माझा जन्म झाला. बालपण हालाकित गेले. समाजाला लागलेला गुन्हेगारीचा शाप पिच्छा सोडत नव्हता. तालुक्यात कोठेही चोरी झाली की वडिलांची रवानगी तुरुंगात होत असे किंवा चौकशीसाठी तरी बोलावणे होत असे या सगळ्याचा आम्हाला त्रास होत असे. यावर उपाय म्हणून आई राणी आणि वडील नमक भोसले यांनी गावठाणातील शासकीय जमीनवर अतिक्रमण करुन तीथे आधी गवती छप्पर आणि आता पत्र्याचे शेड बांधून तेथे रहात आहेत. आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ अशी सहा भावंडे त्यात रोजगाराचे साधन नसल्यामुळे चांगले शिक्षण घेणे तर सोडाच पण दोनवेळ पोटभर जेवण मिळायची सुद्धा भ्रांत. यावर उपाय म्हणून माझ्या आई वडिलांनी आम्हा बहिणींना मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळा मांडवगण ता. श्रीगोंदा येथे प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शाळेत गुण चांगले मिळाल्यामुळे आम्हा तीन बहिणींना त्या शाळेत प्रवेश मिळाला. आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचे सोने करण्यात काही प्रमाणात यशस्वी झालोत हे आज आई वडीलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून वाटते. तरी खरी सत्वपरीक्षा अजून पुढे आहे याची जाणीव आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीच्या वाट्याला आम्हाला झालेला त्रास येऊ नये यासाठी मला फौजदार बनायचं आहे, अशी भावना यावेळी भाग्यश्रीने व्यक्त केली.
यावेळी बोलताना लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे म्हणाले की आदिवासी पारधी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने अशा प्रकारचे यश मिळविणे ही खरी अभिमानास्पद गोष्ट असून परिवर्तनाची नांदी आहे. स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राणी आणि नमक भोसले या दाम्पत्याने केलेले प्रयत्नांचा समाजातील इतर लोकांनी नक्कीच आदर्श घेतला पाहिजे. त्याचबरोबर भाग्यश्रीच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता तिची परिस्थिती तिच्या शिक्षणाच्या आणि स्वप्नांच्या आड येऊ नये. यासाठी भाग्यश्रीचे शैक्षणिक पलकत्व लोकशिक्षण प्रतिष्ठान स्वीकारणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.
यावेळी लोकशिक्षण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रमोद काळे संविधान प्रचारक सतिश ओहोळ (सर) राहुजी साळवे (ग्रामपंचायत सदस्य मढेवडगाव) तसेच भाग्यश्रीचे कुटुंबीय उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here