Ahmadnagar : जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीला पहिल्यांदाच सिना धरण ओव्हर फ्लो…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड या भागाला वरदान ठरलेले कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील निळवंडे, मुळा आणि भंडारदरा धरणाच्या अगोदर पहिल्यांदाच सिना धरण १०० टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

सिना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 द.ल.घ.फू.असून मृतसाठा 552 द.ल.घ.फू. तर गाळ 185 दलघफू व उपयुक्त साठा १८१७.५३ आहे. मागील काही दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडत असलेल्या दमदार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. नवीन पाण्याची आवक होत असल्याने सांडव्यावरून सिना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून सिना नदी दुथडी भरून वाहत आहे.
सिना धरण ओव्हरफ्लो झाल्याने येथील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. धरण पाणलोटमध्ये कर्जत तालुक्यातील सात हजार सहाशे बहात्तर हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सातशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ओलिताखाली येत आहे. कर्जत, आष्टी बरोबर जामखेड, श्रीगोंद्यातील काही भागाला देखील धरणातील पाण्याचा उपयोग होईल.
तत्कालीन माजी मंत्री स्व.आबासाहेब निंबाळकर यांच्या पाठपुराव्यातून सन. १९७२ साली सिना नदी वरील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणाच्या कामास सुरुवात झाली. सिना धरण प्रकल्प कालव्याचे काम सन. १९८५ मध्ये पूर्ण होऊन प्रत्यक्ष सिंचनास सुरूवात झाली. आतापर्यंत सिना धरण परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाले असून पूर्ण क्षमतेने वाहिले असल्याचा इतिहास आहे. यंदा पहिल्यांदाच आॉगस्टच्या सुरुवातीला धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील या जिरायती भागातील शेती व्यवसायाला चांगले दिवस आल्याची चर्चा येथील लाभक्षेत्रातील शेतक-यांमधून होत आहे. गेली ३५ वर्षात सिना धरण अवघे सतरा वेळेस ओव्हरफ्लो झाले आहे.
सिना धरण भरल्याने शेती सिंचनाच्या पाण्याचे नियोजन योग्यरित्या केले जाईल. सिना धरणाच्या सांडव्याद्वारे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या गावातील जनतेने दक्षता बाळगावी.          
 — बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सिना मध्यम प्रकल्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here