Editorial : सुशांतसिंहच्या मृत्यूचे राजकारण

0

राष्ट्र सह्याद्री | 3 ऑगस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली. याचा कसून शोध सध्या पोलिस घेत आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्हहत्येनंतरचा व्हिसेरा रुग्णालयाकडून ताब्यात घेतला. त्यात सुशांतने आत्महत्याच केली, असे स्पष्ट झाले. असे असले, तरी त्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत शरीररक्षकाने माध्यमांना दिलेल्या मुलाखती, सुशांतची पूर्वीची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने दिलेला जबाब, रिया चक्रवर्ती हिच्यासोबत परदेश दाैरा करून आल्यानंतर त्याला दिल्या जात असलेल्या गोळ्या यावरून संशयाचे वातावरण तयार झाले आहे. सुशांतने आत्महत्या केली असली, तरी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले का, याचा आता तपास करावा लागेल.

मुंबई पोलिस याबाबत तपास करीत आहे. मुंबई पोलिसांची तपासाच्या बाबत पूर्वी स्काॅलंडच्या पोलिसांशी तुलना केली जात होती. त्या पोलिसांवर ज्यांच्याकडे गृहमंत्रालयाचीही जबाबदारी होती, त्या देवेंद्र फडणवीस यांनीही अविश्वास दाखवून आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) कडे सोपवण्याची मागणी करावी, यातून त्यांनाही राजकारण करायचे आहे, हे दिसते. ज्या सीबीआयची संभावना काँग्रेसचे सरकार असताना भाजपने पिंज-यातला पोपट अशी केली होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते, त्याच सीबीआयने केलेल्या तपासांवर अनेकदा न्यायालयाने ताशेरे ओढळे होते, त्याच सीबीआयकडे तपास सोपविण्याच्या मागणीवरून आता राजकारण सुरू झाले आहे.

गेल्या सहा वर्षांत सीबीआयची विश्वासार्हता फार वाढलेली नाही, हे मोदी यांच्याच काळात घडलेल्या काही घटनांवरून स्पष्ट होते. सीबीआयचा राजकारणासाठी वापर होत असल्यानेच अनेक राज्यांनी संबंधित राज्यांच्या परवानगीशिवाय सीबीआयला राज्यात येता येणार नाही आणि तपासही करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. सुशांतसिह आत्महत्याप्रकरणाचा मुंबईत आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच या प्रकरणी बिहारमध्ये ही गुन्हा दाखल केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत. एकाच प्रकरणाचा तपास मुंबई आणि बिहार पोलिस करीत आहेत. मुंबई पोलिस आणि रुग्णालय बिहार पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. बिहारच्या राजकीय नेत्यांना सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात एवढा रस का निर्माण झाला, याचे कारण आगामी तीन महिन्यांत तिथे होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याच मुद्द्यावर भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयकडे तपास सोपवायला विरोध केला आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. सुशांतच्या वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. सुशांतच्या माजी व्यवस्थापकाच्या निधनानंतर सुशांत फार काळजीत आणि घाबरलेला होता,  असे सिद्धार्थ पिठानीने सांगितल्यानंतर या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. ज्या दिवशी दिशा सालियानच्या निधनाची बातमी आली, तेव्हा सुशांत काळजीत होता. ही बातमी जेव्हा त्याला कळाली, तेव्हा घरात त्यांची बहीण आणि काही मित्रदेखील असल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी पुढे येत आहेत. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा अद्यापही पोलिसांना उलगडा झालेला नाही. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्या असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

सध्या पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला, तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी होत असताना महाराष्ट्र सरकारने या चौकशीस नकार दिला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्यातील सर्व राजकीय पक्ष सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रस घेऊ लागले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील या प्रकरणात लक्षव घातले आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे बिहारमध्ये केवळ राजकीय मुद्दाच बनला नसून त्या प्रकरणाचे रुपांतर आता या प्रकरणाची चौकशी बिहारी मुलाला न्याय देण्याच्या एका लढाईत झाले आहे.

राज्य सरकार सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवू शकते किंवा नाही, याची शक्यता तपासून पाहण्यास मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जर सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी सांगितल्यास त्याची तत्काळ दखल घ्यावी, अशा सूचना नितीशकुमार यांनी केल्या आहेत. नितीशकुमार परराज्यात राहणाऱ्या बिहारी लोकांची मदत करत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अशा वेळी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आपण बिहारी मुलाच्या बरोबर आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतचा मुद्दा हा बिहारी लोकांसाठी भावनात्मक मुद्दा बनला असल्याचे संयुक्त दलाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीदेखील हे प्रकरण महाराष्ट्र सरकारने आणखी वेळ न दवडता सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी यापूर्वीच या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचादेखील या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला पाठिंबा आहे. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणात आतापर्यंत हाती आलेल्या तपशीलाची समीक्षा करण्यात आली.

सुशांतच्या वडिलांनी मागणी केली, तरच सीबीआय चौकशी शक्य असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना चौकशीत सहकार्य करायला हवे,  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सीबीआय चाैकशीमुळे दोन राज्यांतील भांडणाचा प्रश्नच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा राजकीय वापर करण्यासाठी पावले पडत असल्याचे म्हटले जाते. बिहारच्या पोलिसांनी मुंबईत येऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. बिहार पोलिस हे जॅग्वार, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्यांमधून मुंबईत फिरत आहेत, अशी क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

शनिवारी बिहार पोलिसांनी मुंबईतील कुपर रुग्णालयात जाऊन सुशांतसिंहचा शवविच्छेदन अहवाल मागितला; परंतु येथे त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीच्या दृष्टीने या प्रकरणाकडे बघितले जाते आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे. त्यामुळे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास हे सरकार योग्य पद्धतीने करत नाही, असा ठपका ठेवून या प्रकरणाचा राजकीय लाभ घेतला जाण्याची रणनीती या मागे असू शकते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर ‘ईडी’ने बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे या प्रकरणी सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.

रियाने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये बेनामी खात्यांकडे वळते केल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले. बिहार पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर तसेच सुशांतसिंहचं उत्पन्न, बँक खाती आणि कंपन्यांविषयी स्वतंत्र माहिती गोळा केल्यानंतर ईडीने रिया, तिचे कुटुंबिय आणि अन्य सहा जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अन्य एक एफआयआरदेखील ईडीच्या चौकशीचा भाग असेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यात सुशांतसिंहच्या लेखापालांनी त्याच्या खात्यात १५ कोटी रुपये कधीच नव्हते, असे म्हटल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.

आता सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकच्या कंपन्यांची ईडी चौकशी करणार आहे. या दरम्यान रियाची या कंपन्यांमध्ये काय भूमिका होती हे सत्य उघडकीस येणार आहे. शिवाय रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.त्यात रियाने एकीकडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना ती आणि तिचा भाऊ गायब झाल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. सुशांतसिंह राजपूत यांच्या बहिणीने संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here