Newasa : शिलान्यास भूमिपूजन सोहळयासाठी भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड येथून अयोध्येकडे रवाना

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

साधू संत व कारसेवकांच्या बलिदानामुळेच अयोध्येत शिलान्यास व भूमिपूजन करण्याचा सुवर्णयोग-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा – अयोध्येला दि.५ ऑगस्ट रोजी होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळयासाठी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख व सन १९९२ साली कारसेवक म्हणून भूमिका बजावणारे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रवाना झाले. साधू संत व कारसेवकांच्या बलिदानामुळेच अयोध्येत शिलान्यास व भूमिपूजन करण्याचा सुवर्णयोग आला असल्याची भावना गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी निघण्यापूर्वी बोलून दाखवली.

यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की आज तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्री रामाचे मंदिर निर्माणाचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशवासियांची भावना यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. यासाठी अनेक संत महंत रामभक्त कारसेवक यांनी अपार कष्ट घेतले आहे. महाराष्ट्रातील संप्रदायाच्या वतीने आम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे. देशातील संत महंत यांच्याबरोबरच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि.५ ऑगस्ट रोजी शिलान्यास व भूमिपूजन होत आहे. आपण दिलेल्या श्रद्धेच्या भावनांचे गाठोडे घेऊन आम्ही अयोध्येला जात आहोत आपल्या भावना आम्ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करणार आहोत.

प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची उभारणी सामंजस्य व मानवतेची उभारणी आहे. प्रभू रामचंद्र यांच्यासह भगवान श्रीकृष्ण व भगवान शंकर हे या देशाच्या राष्ट्रीय देवता आहेत त्यांनी इतर जाती धर्मात गुंफवू नका असे आवाहन त्यांनी केले.दि.५ ऑगस्ट रोजी सर्वांनी मठ मंदिरात व घरासमोर रांगोळया काढून सडामार्जन करावे,प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करावे दुपारी बारा वाजता आरती गाऊन प्रसाद वाटावा,यावेळेस आपण सर्वजण अयोध्येला आहोत अशी भावना मनाशी बाळगून हा आनंद साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रभू रामचंद्रांचे अयोध्येतील मंदिर हे जगात आदर्श ठरावे असा प्रयत्न न्यास समितीचा असून आम्ही खारीचा वाटा म्हणून पूजा करणार आहोत अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

अयोध्येला निघण्यापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाधीसह भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते संतपूजन करून सत्कार करण्यात आला. भेंडे येथील श्री हनुमान मंदिर देवस्थान व नागेबाबा पतसंस्था परिवाराच्या वतीने कडूभाऊ काळे व वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेश गुरू कुलकर्णी यांनी धर्म ध्वज भेट देऊन सन्मान केला. भक्त मंडळाच्या वतीने ज्येष्ठ संतसेवक अंबादास फोलाणे, निवृत्ती सुडके, ज्ञानदेव लोखंडे, बाळू महाराज कानडे, बदाम महाराज पठाडे, बाळासाहेब पाटील, कचरू भागवत, तात्या महाराज शिंदे, पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण, इकबाल शेख, शंकर नाबदे, राहुल कोळसे,गणेश मुळे,मुरमे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अजय साबळे, तलाठी सोपान गायकवाड,भीमाशंकर वरखडे,संदीप साबळे,बंटी पठाडे, विश्व हिंदू परीषदेच्या वतीने अँड.सुनील चावरे, विश्वनाथ नानेकर, सरला बेटचे हभप बहिरट महाराज,संभाजीनगर भक्त मंडळाच्या वतीने रामजी विधाते,बजरंग विधाते यांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे सत्काराद्वारे संतपूजन करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. नामदेव महाराज कंधारकर, ह.भ.प. लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, सदस्य विक्रम चौधरी, बाळासाहेब सोनवणे, कैलास झगरे रविंद्र शेरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here