कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका?

0

पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
कोल्हापूर / सांगली : यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावर असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सलग दुसर्‍या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा ही 31 फुटांवरून वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूरवासीयांना पुराची आठवण
कोल्हापूर शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी अवघ्या दोन तासात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गेल्या वर्षीच्या पुराची आठवण झालीय. तर कोल्हापुरात जोतिबा-केर्ली हा मार्ग गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा खचला आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 29 फूट 7 इंच इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तसंच धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here