Kopargaon : ʻगायत्री कंस्ट्रक्शनʼच्या अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0
तालुक्यातील लाखो घनफुट माती मुरूम चोरी प्रकरण
नगर : शेतामध्ये अतिक्रमण करून माती आणि मुरूम चोरून नेल्याप्रकरणी ठेकेदार ʻगायत्री कंस्ट्रक्शन कंपनीʼचे वरीष्ठ अधिकारी दुंगा राव आणि पितांबर जेना यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत  यांनी सोमवारी फेटाळून लावला. 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातून माती व मुरुमाची चोरी केल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी, अटक टाळण्यासाठी आरोपी राव आणि जेना (दोघेही सध्या राहणार चांदेकसारे, ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यात, तक्रारदार मुनोत यांची तक्रार खोटी असल्याचा आणि प्रकरण दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, न्या. भागवत यांनी जामीन अर्ज फेटाळतांना, आरोपीं त्यांच्या  दाव्याच्या समर्थनार्थ प्रथमदर्शनी कोणतेही पुरावे  सादर करू शकले नाही, असे नमूद केले.
नोकरीनिमित्त पुण्यात राहणारे दीपक मुनोत यांची देर्डे चांदवड (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे शेतजमीन आहे. कंपनीने त्यांच्या शेतात विनापरवाना खोदकाम करून सुमारे ५४ लाख घनफूट माती आणि मुरूम चोरून नेल्याचा हा प्रकार आहे. मुनोत यांच्या मालकीची एकत्रित ३ एकर १५ गुंठे जमीन आहे. या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. गायत्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे  प्रकल्प प्रमुख ताता राव, पितांबर जेना यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, जेसीबी चालक यांनी संगनमताने शेतामध्ये बेकायदा प्रवेश करून सुमारे ४० फूट खोल खोदकाम करून माती तसेच मुरूम चोरून नेल्याच्या आरोपावरून  त्यांच्याविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनोत यांनी डिसेंबर २०१९ मध्येच पोलिसांकडे तक्रार केली होती. पाठपुरावा केल्यानंतर सहा महिन्यांनी १६ जून २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मुनोत यांच्यावतीने ॲड. शंतनू धोर्डे आणि सुयोग जगताप यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here