कृषक कन्या : सामाजिक व राजकीय वाटेची पांथस्थ ः अनुराधा ताई

0

शब्दांकन ः प्रदीपकुमार आहेर

कें द्र व राज्यातील राजकारणात एक मानाने घेतले जाणारे नाव म्हणजे दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक. त्यांनी आपली कन्या अनुराधा आदिक यांना राजकारण, आयुर्वेदिक, समाजकारणाचे धडे दिले. राजकीय वारसा असलेल्या घराण्यात जन्माला आलेल्या या रणरागिनी राजकारणाचे पाठही आत्मसात केले. वडिलांनंतर कृषक समाजाची धुरा खांद्यावर घेतली आणि ही कृषक कन्या या सामाजिक व राजकीय वाटेची पांथस्थ बनली. पहिल्यांदाच निवडणूक लढवीत त्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. समाजकारणाचा वारसा पुढे चालविताना राजकारण विरहित विकास करून शहराचा कायापालट करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

गोविंदराव आदिक असताना त्यांच्या कुटुंबातील केवळ अविनाश आदिक हे सर्वच क्षेत्रात आले. सामाजिक कार्याची आवड असलेल्या अनुराधा आदिक यापूर्वी ठाणे येथील हॅपी होम स्कूल ब्लाईंडमध्ये स्वयंसेविका म्हणून काम केले. अंध मुले-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्नांना त्यावेळी मोठे यश आले. तसेच जानकी प्रतिष्ठानच्या ठाणे येथील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी वाढावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी पालकांचे मेळावे आयोजित केले. त्यांचे समुपदेशन केले. खेळामुळे मुलांच्या आरोग्यावर कसे सकारात्मक परिणाम होतात, त्यातून एक उद्याचा समृद्ध देश कसा घडला जाईल याचे महत्त्व त्यांनी पालकांना अतिशय कळकळीने पटवून दिले.

समाजकारण करताना आपल्याला भविष्यात राजकारणाच्या आखाड्यात दंड थोपटावे लागतील हे त्यावेळी त्यांच्या गावीही नव्हते. गोविंदराव आदिक यांनी स्थापन केलेल्या व त्यांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या महाराष्ट्र कृषक समाजाला आधार देण्याची जबाबदारी अनुराधाताई आदिक यांनी स्वीकारली, नव्हे तर ती यशस्वीपणे पारही पाडत आहेत. कृषककन्या म्हणून राज्यभर त्यांनी काम सुरू आहे. शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासकीय स्तरावरील तातडीची मदत मिळवून दिली. त्यांची प्रकरणे तयार करण्यापासून तर ती मदत त्यांच्या हातात पडेस्तोवर त्यांनी पाठपुरावा केला. हे सर्व सुरू असताना शेतकरी आत्महत्येस का प्रवृत्त होतो याचा अभ्यास त्यांनी केला. शेतकरी कर्जाला नाही तर बँकेच्या व्याजाला त्यांच्या जाचाला घाबरतो हे त्यांनी ताडले. त्यावर उपाय म्हणून कर्जबाजारी शेतकरी व बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधून शेतकर्‍यांना कर्ज परतफेडीस मुदतवाढ मिळवून दिली. अनेक शेतकर्‍यांसाठी बँकांना एकरकमी कर्ज योजना राबवण्यास भाग पाडले. सततच्या दुष्काळी स्थितीबरोबरच आकारी पीडित जमिनीचा प्रश्न, आणेवारी, कांद्याचे बाजारभाव अशा विविध चळवळी त्यांनी कृषकाच्या माध्यमातून उभारल्या.

त्यातच 2016 ची नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. माजी आमदार जयंत ससाणे यांच्या एक हाती असलेल्या सत्तेला आव्हान देण्यासाठी सर्वपक्षीयांनी आदिक कुटुंबियांवर शिक्कामोर्तब केले आणि दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा अधिक यांच्या नावावर एकमत झाले. राजकीय कुटुंबात जन्म झालेला असला तरी समाजकारणाचा मूळ पिंड. सर्वांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवली, जिंकली आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या. शहरातील विविध प्रश्न, विकास कामे यांच्यावर लक्ष केंद्रित करत  हळूहळू सुरुवात झाली. नगराध्यक्षा म्हणून सुरुवात करताना कोणताही अनुभव पाठीशी नसताना पालिकेच्या कामकाजाची बाराखडीपासून सुरुवात करत त्यातील बारकावे हळूहळू त्यांनी आत्मसात केले.

राजकीय हेवेदावे, रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप यांची सवय नसलेल्या अनुराधा यांना प्रारंभी या सर्व प्रकारामुळे थोड्या व्यथित झाल्या. वडिलांचा राजकीय प्रवास त्यांनी जवळून पाहिला होता. अनेक चढ-उतार आल्यानंतरही कधीही न खचलेल्या वडिलांच्या विचारांचा आदर्श अनुराधा यांच्यासमोर होता. त्यामुळे आलेल्या राजकीय सकंटाचा कामकाजातील बाबींचा बारकाईने अभ्यास करून त्या शहरवासीयांसाठी पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहिल्या. पालिकेचे विकास काम करत असताना यापूर्वी महायुती सरकार असतानाही त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत शहरातील अनेक विकासकामांसाठी निधी आणला. राजकारण करताना समाजकारणावर भर देत अनुराधा आदिक यांनी महिलांच्या सबलीकरणाला प्राधान्य दिले. जानकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी व्याख्याने, शिबिरे, प्रशिक्षणे आयोजित करून विचारांना कृतीची जोड दिली.

महिलांच्या बचतगटांना चालना देण्यासाठी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करून त्यांच्या खाद्यपदार्थांना मार्केट निर्माण करून दिले. महिलांच्या उन्नतीसाठी सर्वच राजकीय पुढारी प्रयत्न करतात, अनुराधा आदिक यांनी मात्र महिलांसोबत समाजात नेहमीच उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच व्यासपीठ निर्माण करून दिले. महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांना बोलावून मान-सन्मान केला. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्यक्रमात ज्यांना आवर्जून दूर ठेवले जाते अशा तृतीयपंथीयांना सामील करून घेतले. सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान या तृतीयपंथीयांना आरतीचा मान देणार्‍या त्या पहिल्या नगराध्यक्षा ठरल्या. ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा प्रथमच त्यांनी विमा उतरविला. कर्मचार्‍यांना याचा लाभ झाला. पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना हात मोजे, बूट मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे; मात्र वर्षानुवर्षे हा अधिकार केवळ कागदावर पाहणार्‍या महिला कर्मचार्‍यांना आदिक यांनी प्रथमच हा अधिकार मिळवून दिला.

कर्मचार्‍यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्यास त्यांनी प्राधान्य दिले. शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न व्यवसायिकांच्या वाढत्या चोर्‍या याबाबतही लक्ष घालून शहरामध्ये सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. खासदार सुप्रियाताई सुळे यांना महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलावून त्यांच्याकडून सॅटेलाइट मंडईसाठी निधी प्राप्त करून घेतला. त्या मधील संजयनगरमधील सॅटेलाईट मंडईसाठी निधीही नगरपालिकेला मिळणार असल्याचे नुकतेच पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. या सर्व विषयाला हात घालत ही कृषक कन्या राजकीय आखाड्यातील रणरागिणी ठरेल यात यत्किंचितही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here