विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : आमच्या मुलाने संकटाच्या काळात ही हिम्मत दाखवत एवढ्या प्रवाशांचे प्राण वाचवले. याचे समाधान वाटते. असं कॅप्टन दीपक साठे यांच्या आई नीला साठे यांनी म्हटलं आहे. म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. मात्र या घटनेत देवाने कोणाला तारले आणि कोणाला मारले. देवाच्या इच्छेसमोर काय म्हणावे. माझा मुलगा लहानपणापासून हुशार होता. प्रत्येक बाबतीत त्याने गुणवत्ता दाखविली. आज तो गेला, एक आई म्हणून आणखी काय म्हणावे, असं नीला साठे म्हणाल्या. विशेष म्हणजे आज 83 वर्षीय नीला साठे यांचा वाढदिवस आहे. आणि एक दिवस आधी त्यांचा मुलगा गेला.
दिपक साठे यांच्या आईच्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवसाआधी प्रवाशांचे जीव वाचवताना दिपक यांचा मृत्यू झाला. आई तिच्या मुलाने वैमानिक म्हणून त्याचे कर्तव्य चोख बजावले आणि प्रवाशांचे प्राण वाचवले याचं मला समाधान असल्याची प्रतिक्रिया देत आहे. धीरोदात्त आईने आज त्यांच्या वैमानिक पुत्राच्या मृत्यूचा शोक न करता त्याच्या कामगिरीचा गर्व असल्याची प्रतिक्रिया देत एक वेगळाच उदाहरण जगासमोर ठेवला आहे.
दीपक साठे यांचे वृद्ध आई वडील सध्या नागपुरात त्यांच्या नातेवाईकांकडे राहतात. एबीपी माझासोबत बोलताना या धीरोदात्त आई वडिलांनी पुत्र गमावल्याचा दुःख व्यक्त करतानाच त्यांच्या पुत्राने समयसूचकता दाखवत 170 प्रवाशांचे प्राण वाचवले याचं समाधान असल्याची भावना व्यक्त केली. दीपक साठे हे विद्यार्थी दशेपासून खूप हुशार होते. शैक्षणिक आयुष्यानंतर एनडीए मध्ये प्रशिक्षण घेताना, त्यानंतर भारतीय हवाई दलात सेवा देताना त्यांनी अनेक पुरस्कार आणि मेडल्स मिळवल्याची माहिती दीपक साठे यांच्या आई नीला साठे आणि वडील रिटायर्ड कर्नल वसंत साठे यांनी दिली.
मुलाने संकटाच्या काळात ही दाखवलेली हिम्मत आणि समयसूचकता एवढ्या प्रवाश्यांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची ठरली याचे सार्थ अभिमान असल्याची भावना नीला साठे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. दीपक साठे यांचे वडील भारतीय सैन्यातून कर्नल या मानाच्या पदातून सेवानिवृत्त झाले असून आज मुलाच्या मृत्यूनंतर ते निशब्द झाले आहे. मुलाचा मला सार्थ अभिमान आहे एवढीच प्रतिक्रिया 87 वर्षीय कर्नल वसंत साठे यांनी दिली.