प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
संगमनेर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन लोकांना गर्भलिंग चिकित्सा किंवा तत्सम माहिती देण्यासाठी आयोजित केलेलं नव्हतं. तर ते एक अध्यात्मिक प्रबोधनासाठी होतं. त्यामुळे कथित विधान त्यामध्ये झालं असलं तरी जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, असं निरीक्षण संगमनेरच्या सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे.
इंदोरीकर महाराजांविरूद्ध कनिष्ठ न्यायालयातील खटल्याला संगमनेरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी हा आदेश दिला आहे. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
इंदोरीकर महाराजांच्यावतीने बाजू मांडताना अड. के. डी. धुमाळ यांनी बालाजी तांबे यांच्याविरूद्धच्या अशाच एका खटल्याचा संदर्भ दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यावेळी तांबे यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. तो आदेशही धुमाळ यांनी या खटल्यात युक्तिवाद करताना कोर्टात सादर केला आहे.
इंदोरीकर महाराजांतर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादातील काही मुद्दे ग्राह्य धरण्यासारखे असून त्या आधारे कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला स्थगित देत असल्याचं आदेशात म्हटलं आहे.