प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि.८
कर्जत : स्वस्त धान्य वाटपासाठी ग्राहकांचा बायोमेट्रिक थंब (अंगठा) सुरु केल्याने पुन्हा ग्राहकांसह स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटपात सुरक्षितता पाळण्याचे प्रशासनापुढे आवाहन असताना पुन्हा जुन्या नियमाची अंमलबजावणी करणे त्रासदायक ठरत आहे.
कर्जत शहरातील स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य वाटप सुरु आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागात अथवा शहरात कुठेही कोरोनाचा शिरकाव नसताना शासनाने बायोमेट्रिक पद्धत बंद करीत रेशनकार्डावर धान्य दिले होते. मात्र, या महिन्यात धान्य वाटप करताना पुन्हा जुनी बायोमेट्रिक पद्धत राबवली असल्याने ग्राहकांचा संताप वाढला आहे. ज्यावेळी जिल्हास्तरावरच प्रादुर्भाव सुरु होता त्यावेळी काळजी घेतली जात होती आणि आता तालुक्याच्या अनेक गावात कर्जत शहरात कोरोनाने शिरकाव केला असतांना शासन धान्य वाटपाबाबत काळजी घेत नसताना दिसत आहे.
जुलै महिन्याचे मोफत धान्य काल (दि.७)ऑगस्ट रोजी वाटप करण्याचे आदेश झाले आणि प्रत्यक्ष ग्राहकाचे अंगठे मशीनवर घेण्याचे सांगून दि.१० पर्यंत वाटप करण्याचे सांगितले असल्याचे दूकानदाराचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष दि.८रोजी वाटप सुरु करुन १०तारखेला संपवायचे आदेश असल्याने आज वाटप सुरु करण्यात आले परंतु बायोमेट्रिक मशीनला रेंज नसणे, ग्राहकांचे अंगठे न उठने यासह मशीन चार्जिंग नसणे आदि अडचणीमुळे दिवसभर ग्राहक आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक चकमकीच्या फैरी झडत आहे.अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदरचा प्रकार समोर आला.
सकाळी लाईनला उभे असलेले ग्राहक अंगठे न उठल्याने सायंकाळपर्यंत रिकाम्या हातानेच घरी जाताना तेथेच संताप व्यक्त करताना दिसत होते. सध्या कर्जत शहरासह तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असताना स्वस्त धान्य दुकानात मागील महिन्याचे मोफत धान्य तीन दिवसात वाटण्याचे आदेश देण्यात आले. त्यात कमी होते म्हणून ग्राहकांचे अंगठे घेण्याचे फर्मान प्रशासनाकडून काढले गेले असल्याचे दूकानदार सांगत आहेत. मशीनला रेंज, चार्जिंग, ग्राहकांचे अंगठे न उमटणे अशा प्रकाराने दुकानदारांसह ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
एका दिवसात मशिनच्या अडचणीमुळे १३०० पैकी फक्त १५० रेशनकार्ड नोंदले गेले. दोन दिवसात उर्वरित कार्ड नोंदविन्याचे आव्हान दुकानदारांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मुदत वाढ द्यावी किंवा सरसकट कार्ड नोंदवुन धान्य द्यावे अशी ग्राहकांची मागणी समोर येत आहे.