Rahuri : सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी पोलिसांनी दिनांक ७ ऑगस्ट रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर नाकाबंदी दरम्यान मोटारसायकल चोरणा-या टोळीचा छडा लावून रामदास कोळसे याच्या मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या आरोपी कडून आणखी मोटारसायकली मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कारवाईने राहुरी पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 
राहुरी पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करणे व आरोपींना जेरबंद करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे तसेच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करणेबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलीस उप निरीक्षक गणेश शेळके व इतर कर्मचारी यांचेसह मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होणे कामी विशेष पथकाची निर्मिती केली.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम चोरीच्या गाड्यांची खरेदी विक्री करत असून त्यापैकी एक इसम विना क्रमांकाच्या चोरीच्या मोटरसायकलने मल्हारवाडीकडे जात आहे. या मिळालेल्या माहितीच्या आधारे मुकुंद देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार व केलेल्या मार्गदर्शनानुसार दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक गणेश शेळके, पोलिस हवालदार संतोष राठोड, पोलिस शिपाई श्रीकृष्ण केकान नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन यांनी नगर मनमाड महामार्गावर मल्हारवाडी चौक येथे नाकाबंदी केली.

यावेळी एका विना क्रमांकाच्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलवर जाणाऱ्या एका संशयित इसमास थांबून त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारपूस केली. त्याला त्याबाबत काहीएक खात्रीशीर माहिती देता न आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने त्याचे नाव रामदास दौलत कोळसे वय ३२ वर्ष राहणार गडदे आखाडा तालुका राहुरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याचे ताब्यातील मोटारसायकलबाबत तो चुकिची माहिती सांगत असल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच ही मोटरसायकल चोरीची असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने इतर ३ मोटार सायकल चोरले असल्याबाबत कबुली दिली. त्यानुसार त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी पोलिस पथकाने जाऊन सदरच्या मोटारसायकल जप्त करून ताब्यात घेतल्या आहेत.
तसेच त्याच्याकडून त्याच्या इतर २ साथीदारांची माहिती मिळाली. सबंधित इसमांचा शोध घेऊन त्यांचेकडून अधिक मोटारसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकल संदर्भात लोणी, राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलिस हवालदार संतोष राठोड, पोलिस शिपाई श्रीकृष्ण केकान यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here