जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश….मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी..!

0

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

मुंबई : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी गडाख यांच्या प्रवेशामुळे भरून काढली जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेची अहमदनगर जिल्ह्यात ताकद वाढवण्याचे महत्त्वाचे काम उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर सोपविले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून होऊन बाहेर पडल्यानंतर गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली विधानसभा निवडणूक लढविली. या विधानसभेला ते विजयी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. “पक्षाची सत्ता असो वा नसो, मी सदैव तुमच्यासोबत राहील” असा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला होता. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि शंकरराव यांची गेल्या दहा वर्षापासून मैत्री आहे. या मैत्रीमुळे शंकरराव शिवसेनेच्या जवळ गेले. शिवाय माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध होते. गडाख आणि ठाकरे यांच्यातील हे स्नेहबंध आता दुसऱ्या पिढीत परावर्तित झाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी गडाख यांच्या खांद्यावर देत त्यांना शिवसेनेत सामावून घेतले आहे. माजी आमदार अनिल राठोड यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या निधनाने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी गडाख यांच्या प्रवेशाने भरून काढली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘राष्ट्र सह्याद्री’शी बोलताना नामदार गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.

“शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. कोरोना काळात संकटाला सामना करताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. जनतेला धीर दिला. शिवसेनेत प्रवेश करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील. निवडणुकीत जनतेने दिलेला विश्वास यानिमित्ताने सार्थ ठरवता येईल.”

-शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here