राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फार कडवट कधी बोलत नाहीत. अतिशय संयमी नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. कधी कधी कुणी त्यांच्यावर फारच टीका केली, तरी ते तिरकस प्रतिक्रिया देतात. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ यांच्याबाबत केलेल्या तीव्र टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेही अचंबित झाले. पवार यांच्यावर टीकेची एकही संधी सोडणारे नितेश राणे यांनी तर पार्थच्या कानउघाडणीनंतर त्यांना भाजपच्या विचाराच्या जवळचे असल्याचे सांगून त्यांच्यांशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून पार्थ यांना उमेदवारी द्यायला शरद पवारांचा विरोध होता. त्यांच्या विरोधाची पर्वा न करता पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली. तिथे अजितदादांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. पवार कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कधीच पराभवाला सामोरे जावे लागले नाही. पार्थ यांच्यामुळे पराभवाचा ठपका लागला. पवारांच्या कुटुंबात शरदरावांपेक्षा ज्येष्ठ आता त्यांच्या मोठ्या भगिनी आहेत. असे असले, तरी राजकीय निर्णयात शरदरावांचा शब्द अंतिम असतो.

आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला एक पराभव वगळता संसदीय निवडणुकीत त्यांना एकही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. अनेक उन्हाळे, पावसाळे, कुरघोड्यांच्या राजकारणाची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिली. त्यामुळे राजकारणात कुठे काय बोलायचे, केव्हा बोलायचे, याचे शरदरावांना चांगलेच कळते. त्यात ते ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्या पक्षातील अन्य कुणी नव्हे, तर त्यांच्याच नातवाने विरोधी सूर लावावा, यामुळे पवारांना दुःख होणे स्वाभावीक आहे. त्यातही एक नातू अतिशय परिपक्व वागतो आहे, पवारांवरील तसेच पक्षावरील टीका तो समर्थपणे परतवून लावीत असताना दुसरा नातू त्याच्याच वक्तव्याने पक्षाला आणि पर्यायाने पवारांना अडचणीत आणीत असेल, तर त्याला कुठेतरी फटकारले पाहिजे, असे त्यांना वाटले असेल, तर त्यात चुकीचे काही नाही; परंतु नातवाचे कान चारचाैघात धरण्यापेक्षा चार भिंतीच्या आत धरायला हवे होते, असे मानणारा मोठा वर्ग आहे. शरदरावांना हे कळत नसेल, असे थोडेच आहे. पार्थ यांची अप्रत्यक्षरीत्या शरद पवार आणि पक्षाच्या विरोधातील भूमिका ही त्यांनी स्वतःच घेतली, की त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हा वादाचा मुद्दा आहे. कदाचित अन्य कुणाला पार्थ यांच्या तोंडून अन्य कुणी बोलत नसेल, असे वाटले नसणार; परंतु चाणाक्ष शरदरावांच्या नजरेतून सुटली नसावी. त्यामुळे तर त्यांनी लेकी बोले, सुना लागे अशा पद्धतीने कान टोचले तर नसतील ना, असे राजकीय तत्ज्ञांना वाटले, तर नवल नाही.
सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणावरून केंद्र आणि राज्य तसेच महाराष्ट्र विरुद्ध बिहार असा संघर्ष सुरू आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. त्यातच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे तपास वर्ग करायला विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयात ही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. रोहित पवारांनी भाजपच्या विरोधात यापूर्वी भूमिका घेतली आहे. तसेच मुंबई पोलिस तपास करण्यास समर्थ आहे, असे त्यांनी सांगितले असताना त्यांच्याच चुलत भावाने म्हणजे पार्थ यांनी मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन सीबीआय तपास करण्याची मागणी केली.
पवार यांच्या दोन नातवांतच मतभिन्नता असल्याचे चित्र त्यामुळे पुढे आले. शरद पवार हे अत्यंत पुरोगामी विचाराचे. ते शक्यतो कधीच मंदिरात जात नाही. विठ्ठलाची मुख्यमंत्री म्हणून केलेली पूजा, भीमाशंकरला मंदिरात जाणे आणि कधीतरी शिर्डीत साईंच्या मंदिरात लावलेली हजेरी असे अपवादात्मक प्रसंग वगळले, तर त्यांनी कधीच मंदिरात जाण्याचा फार दुराग्रह धरला नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली आणि त्यानंतरच्या बाँबस्फोटातून मुंबईला सावरण्याचे आणि तिला पूर्वपदावर आणण्याचे श्रेय पवारांना जाते.
राम मंदिराच्या पायाभरणीबाबत पवारांना विचारले, तेव्हा त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता तिथे जाणे योग्य नाही आणि राम मंदिराच्या मुद्यापेक्षा सध्या कोरोनावर मात करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवरही पार्थ यांनी मात्र भूमिपूजनाच्या दिवशी जय श्रीराम ही प्रतिक्रिया व्यक्त करणे याला जास्त महत्त्व आहे. सध्या हिंदुत्त्ववाद्यांची चलती आहे. काँग्रेसनेही साैम्य हिंदुत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहिली, तर हिंदुत्त्वाला पूरक भूमिका घेणे फायद्याचे आहे, असे पार्थ यांना वाटले असावे. पार्थ यांच्या अशा भूमिकांमुळे शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असावी. शदर पवार यांनी मात्र पार्थ च्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असे विधान करत पार्थ यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शरद पवार यांनी पार्थ यांचा केलेला पाणउतारा हा इतर नेत्यांना सूचक इशारा असल्याचे मानले जाते.
शरद पवार यांनी नातवाच्या केलेल्या कानउघाडणीचा भाजपच्या नेत्यांना आनंद होणे स्वाभावीक आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची, की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असे वागायचे, की नाही हे नातवांनी ठरवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य पार्थ पवार यांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे, तर पार्थ हे लंबी रेस का घोडा आहेत, असे ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. शरद पवार यांच्या टीकेनंतर अजित पवार यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडली. पुण्याला जायचे आहे, असे सांगून प्रत्यक्षात ते शरद पवार यांच्या ‘सिल्वहर ओक’ या निवासस्थानी भेट दिली. तेथे अजितदादा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे उपस्थित होते. बराच काळ बैठक झाली. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अजितदादांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, यावरून मामला गंभीर आहे,. हे लक्षात येते.
पार्थ यांच्या या वागण्याचा थेट संबंध अजित पवार यांच्या नाराजीशी असल्याचे सांगितले जाते. पार्थ यांच्या भूमिका म्हणजे जे अजित पवारांना जाहीरपणे बोलता येत नाही, ते पार्थ बोलत आहेत. अजित पवार यांच्या मनात काहीतरी वेगळे सुरू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 2004 मध्येही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद सोडले होते, त्यावेळीही ते नाराज होते. गेल्या वर्षभरातही त्यांनी नाराजीचे संकेत अनेकदा दिले आहेत. पार्थ यांनी घेतलेली भूमिका पक्षातल्या इतर कुणी कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने घेतली असती तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली असती; पण पार्थवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्याला पाठिशी घातले जात आहे, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू नये, हा ही शरद पवार यांच्या कानटोचणीचा अर्थ आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असण्याचीही शक्यता आहे. भाजपसोबत जाण्यावरून पवार कुटुंबातच मतभेद असू शकतात. ते असे मधूनमधून व्यक्त होतात. अजितदादांना भाजपच्या सरकारमधून बाहेर पडावे लागल्याची सल अशा निमित्ताने व्यक्त होत असावी. शरद पवार आपल्या नाराजीच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनाच पार्थची समजूत काढण्यास सांगत असावेत.
आजोबांच्या तीव्र प्रतिक्रियेवर पार्थ यांनी काहीही बोलण्यास नकार दिला असला, तरी पवार कुटुंबात मात्र बऱ्याच हालचालींना वेग आला आहे. पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सुशांत प्रकरणी शरद पवार यांनी नातवाला उघडपणे फटकारल्याने विरोधी पक्ष भाजपसाठी आयते कोलित सापडले. पार्थ पवार गेले काही दिवस चर्चेत आहेत. ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राज्यातील महाविकास आघाडीच्या अजेंड्याशी विसंगत भूमिका घेत असल्याने चुकीचा संदेश जात असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. पवार यांच्या या विधानातून नातवाबद्दल तीव्र संताप व्यक्त झाल्याने पवार कुटुंबातही चलबिचल वाढली आहे.