प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सोनई गावात मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा आकडा शून्यावर आला होता. त्यामुळे सोनई आता कोरोनाच्या कचाट्यातून सूटली, असे वाटत असतानाच सोनई गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून सोनई गावासह मुळा कारखाना परिसरात देखील कोरोना बाधित आढळले असून बाधितांचा आकडा अठरावर पोहोचला आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सोनई पोलीस स्टेशनमध्येच कोरोनाची लागण झाल्यामुळे गावात पोलिसांचे लक्ष कमी झाले तर महसूल खाते देखील कोरोना मुळे प्रभावित झाले असून तलाठी देखील फारसे लक्ष देत नाही. मग गावात मास्क न लावता फिरणे, एकाच ठिकाणी गर्दी करणे, किराणा दुकान कापड दुकानात तर तुफान गर्दी आहे. शासनाने दिलेले नियम न पाळणे, सकाळी ९ ते सांय ५ वाजे पर्यंत बाजारपेठ चालू ठेवण्यासाठी शासनाने वेळ ठरवून दिली आहे पण हे नियम फारसे कुणीही गांभीर्याने पाळत नाहीत. याचा परिणाम कोरोना बाधिताचा वाढता आलेख होय.
मागच्या आठवड्यात सोनईमध्ये कोरोनाचा आकडा शून्यावर आला होता. परंतु सोनई पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ती शृंखला पुन्हा सुरु झाली असून सोनईत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येऊ शकते. कारण सोनई बरोबरच बेल्हेकरवाडी धनगरवाडी शिंगणापूर मुळा कारखाना याठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे धक्कादायक असून काल सोनई गावात पंचेचाळीस जणांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यात दहा रुग्ण बाधित असून त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवले असल्याची माहिती सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी दिली.
कोरोना हा संसर्गजन्य असून या विषाणूचे संक्रमण हे बहुतांश ठिकाणी झाले असून रॅपिड अँटीजन तपासणीत हे रुग्ण सापडत असून यामुळे हा आकडा वाढत आहे. हे संक्रमण थांबणे हे नागरिकांच्याच हातात असून नागरिकांनी मास्क नियमितपणे वापरला पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये गर्दी करु नये, शासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळले तर संक्रमण थांबू शकते.