प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल (बुधवार) पासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) दिवसभर धरणात नवीन पाण्याची जोरदार आवक सुरू राहिली. मागील 24 तासात धरणात 658 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. आज सायंकाळी सहा वाजता धरणसाठा 15 हजार 372 दशलक्ष घनफूट झाला आहे. अशी माहिती धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.
मुळा धरणावरच नगर शहराची आणि एमआयडीसीची तहान अवलंबून आहे. मात्र, या धरणात यंदा पाऊसकाळ चांगला असूनही धिम्या गतीने पाणी येत आहे. या धरणावरच नेवासा, राहुरी, शेवगाव तालुक्यातील शेती अवलंबून आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. पारनेर तालुकाही पिण्याच्या पाण्यासाठी मुळावरच अवलंबून आहे.
लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून धरणात आज सकाळी सहा वाजता 14 हजार 321 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. दुपारी पाण्याची आवक कमी झाली. परंतु, सायंकाळी सहा वाजता 16 हजार 750 क्युसेकने पाण्याची आवक वाढली. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत धरणसाठा 16 हजार हजार दशलक्ष घनफूटाचा टप्पा पार करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धरणाच्या लाभक्षेत्रात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.