प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल झाला असून आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर 2020 ला होणार आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज जिल्हा सत्र न्यायालयात सदर खटल्यावर सुनावणी झाली. सरकारी पक्ष्याच्या वतीने सरकारी वकील बी.जी. कोल्हे हजर झाले. त्यांनी सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. यावर न्यायालयाने त्यांना 16 सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तसेच या खटल्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी अंनिसच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.
आता पुढील सुनावणी दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. सदर खटल्या संदर्भात दिलेल्या अर्जावर इंदोरीकर महाराजांच्या वतीने हरकत घेतली जाणार आहे, असे समजते.