प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कर्जत : कर्जत शहरासह तालुक्यात श्री गणेश बाप्पाचे आगमन भक्तीभावात झाले. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव असल्याने काही गणेश मंडळ आणि बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली आहे. यासह कर्जत तालुक्यातील सात गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत यंदा प्रथमच वाजत गाजत करता आले नाही. आज (दि.२२) गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच अबालवृद्ध घरोघरी बाप्पाच्या स्थापनेत मग्न होती. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे कर्जत शहरातील मराठी शाळेऐवजी दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आलेल होत्या. सकाळ पासून याठिकाणी बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी लगबग सुरू होती. कर्जत शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली आहे. यंदा बाप्पाची भक्तिभावाने घरोघरी स्थापना करून सर्वांनी या कोरोना महामारीच्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाला साकडे घातले आहे.
एक गांव एक गणपतीमध्ये तालुक्यातील सात गावांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यात चखालेवाडी, बेलवंडी, खुरंगेवाडी, हिंगणगाव,राक्षसवाडी बु||, घुमरी, रवळगांव या गावांचा समावेश आहे.
कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण आणि उपाध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या हस्ते आरती करत नवयुग तरुण मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली

