शिवसेना आक्रमक
प्रतिनिधी | कोल्हापूर | आनिल पाटील
पिरणवाडी ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाचा विरोध झुगारून कन्नड संघटनांनी संगोळी रायान्ना यांचा पुतळा पुन्हा रात्रीच्या अंधारात वादग्रस्त जागेत उभारला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शुक्रवारी आज पहाटेपासून शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे.
पिरणवाडी येथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी चौकातील खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. पण याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला लागून संगोळी रायान्ना यांचा पुतळा उभारण्यासाठी काही कन्नड संघटनांनी पंधरा ऑगस्ट रोजी प्रयत्न केला होता. त्या दिवशीही रात्रीच्या अंधारात पुतळा उभारण्यात आला पण पोलिसांनी तो तत्काळ हटविला. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून विविध संघटना जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण विकास मंत्री आणि धनगर समाजाचे नेते ईश्वरप्पा यांच्यासमोर २९ ऑगस्ट रोजी पुतळा संदर्भात सर्वसंमत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. पिरणवाडी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी चौक वगळता अन्यत्र गावात कुठेही सन्मानपूर्वक पुतळा प्रतिष्ठापित करावा, असे आवाहन केले होते.
तरीही रात्रीच्या अंधाराचा काहींनी फायदा उठवत संगोळी रायन्ना यांचा पुतळा उभारला आहे. पहाटे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच शिवसैनिकांनी तेथे आंदोलन सुरू केले आहे. घोषणाबाजी करण्यात येत आहे. पुतळा अन्यत्र प्रतिष्ठापित करावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.