प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कर्जत : भारत देशाची खरी ताकद युवकांच्या हाती असून युवकांनी आपले सामर्थ्य भारताच्या जडण-घडणीत द्यावे. त्यामुळे युवकांनी राजकारणात सक्रिय होत भारत घडवावा, असे मत समन्वयक स्मितल वाबळे यांनी केले. ते कर्जत जामखेड युवक काँग्रेस कार्यकर्ता सवांद मेळाव्यात बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हर्ष शेवाळे, तात्या ढेरे, अजय शेंडगे, राहुल उगले, नगरसेवक डॉ संदीप बरबडे, ओंकार तोटे, अल्पसंख्याक आघाडीचे माजिद पठाण, जोहीन सय्यद, राम जहागीरदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले की, १८ वर्षाच्या युवकाला मतदानाचा अधिकार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिला. मात्र, त्याचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. तो फायदा इंटरनेटच्या माध्यमातून भाजपाने घेतला. कारण काँग्रेसने घेतलेले लोकाभिमुख कार्य युवकांसमोर मांडता आले नाही ही खरी शोकांतिका ठरली. गावागावात युवकांनी आपले संघटन मजबूत करत सर्वसामान्य नागरिकांशी सवांद साधावा जेणेकरून जनतेची कामे सहज पार पाडता येतील. फक्त काँग्रेस पक्षात निष्ठेला फार महत्व आहे. ती निष्ठा युवकांनी आत्मसात करायला हवी. सहा वर्षात केंद्र सरकारने काहीच केले नाही. आज बेरोजगारी वाढली आहे. त्यावर केंद्र सरकार बोलत नाही मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून जातीय राजकारण करण्याचा मोठे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुजवावी लागतील. सर्वसामान्य लोकांची कामे करा हीच काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे असे म्हटले.
यावेळी बोलताना प्रवीण घुले म्हणाले की, भारतातील युवक हीच काँग्रेसची खरी ताकद असून त्यावर युवकांनी खरे उतरले पाहिजे. काँग्रेस पक्षात तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळत आहे. ते इतर पक्षात फार दुर्मिळ दिसते. त्यामुळे अलीकडच्या काळात युवक हाच काँग्रेसचा पक्षाचा खरा कणा आहे. आगामी येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात जे काम आपल्याकडे सोपवतील ते काम सर्वानी प्रामाणिकपणे पार पाडावे आणि संघटन मजबूत करावे. यासह मिळालेल्या संधीचे कार्यकर्त्यानी सोने करावे असे आवाहन उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना केले.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बागल यांनी केले तर आभार शहराध्यक्ष अमोल भगत यांनी मानले.
कार्यकर्ता सवांद मेळाव्यात जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी फुकले नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग
कार्यकर्ता सवांद मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी काँग्रेस पक्षाची कणखर भूमिका विशद करताना कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक प्रभागात काँग्रेसचा उमेदवार उभाच राहायला हवा, असे रणशिंग फुंकले. यामुळे युवकामध्ये नवचैतन्य संचारले होते.