प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारामारीमध्ये लाकडी दांडके डोक्यात मारल्याने एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मांडवगण येथे गुरुवारी (दि.27) दुपारी एकच्या सुमारास घडली.
कानिफनाथ गांगर्डे (वय 65), असे खून झालेल्या इसमाचे नाव असून मंगेश केदारी (वय 40) हा गंभीर जखमी आहे.
कानिफनाथ व मंगेश यांच्यात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास किरकोळ वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरूपाच्या भांडणात होवून दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले यामध्ये मंगेश केदारी याला राग अनावर होऊन जवळील पडलेल्या लाकडी खोऱ्याच्या दांडक्याने कानिफनाथ गांगर्डे यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मयत झाले. तर मंगेश केदारी यांच्या गळ्यावर मार लागून चिरलेला असल्याने गंभीर जखम झाली असून त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणी पाहिले असता कानिफनाथ गांगर्डे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. व त्या ठिकाणी मंगेश केदारी हा उभा होता त्याने स्वतः खून केल्याचे कबूलही केले. त्यांचा मुलगा मंगेश कानिफनाथ गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून भादवि ३०२ प्रमाणे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहे.