प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही सहा महिन्यांपासून आरोपींवर कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने व आरोपीकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दत्तात्रय अंकुश खोरे व रंजना दत्तात्रय खोरे रा. दौंड मूळ गाव काष्टी ता. श्रीगोंदा या पीडित पती पत्नीने (दि.२५) ला उपोषण आंदोलन केले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय अंकुश खोरे व पांडुरंग अंकुश खोरे रा. काष्टी ता. श्रीगोंदा हे सख्खे भाऊ असून त्यांच्यात जमीन वाटपावरून वाद चालू आहे. पांडुरंग खोरे व वडील अंकुश खोरे, पत्नी वैशाली पांडुरंग खोरे हे सतत दत्तात्रय व त्याच्या कुटुंबाला मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि.२९/१/२० पासून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होते.
पांडुरंग हा वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नसल्याचा आरोप करून दत्तात्रय अंकुश खोरे व त्यांची पत्नी रंजना दत्तात्रय खोरे हे उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन व आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
उपोषणानंतर दोन दिवसात अंकुश बापूराव खोरे (वय ६०वर्षे) व पांडुरंग अंकुश खोरे (वय ३५ वर्षे) यांना अटक केली. दि. २६ ऑगस्ट रोजी संपत बाबुराव दिवेकर (वय ५५) हे तिसरे आरोपी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी यांच्या पथकाने अटक केली त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चौथी आरोपी पांडुरंगची पत्नी वैशाली पांडुरंग खोरे ही अद्याप फरार फरार असून तिचा शोध चालू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी व पोलिस हवालदार गागंर्डे हे करत आहेत.