प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक रुपया दंड ठोठावला आहे.
तत्पूर्वी न्यायालयाने अॅटॉर्नी जनरलच्या सल्ल्याने प्रशांत भूषण यांना माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र भूषण यांनी आपण कोणती चूक केली नाही त्यामुळे माफी मागणार नाही असे न्यायालयासमोर स्पष्ट केले.
त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना एक रुपया दंड ठोठावला तसेच हा दंड 15 सप्टेंबरपर्यंत न भरल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 वर्षांपर्यंत वकिलीवर बंदी घालण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या मानहानीचं नेमकं प्रकरण काय?
सुप्रीम कोर्टने प्रशांत भूषण यांना आपल्या ट्वीटमधून न्यायालयाची मानहानी केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 27 जून रोजी प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांवर (सीजेआय) टीका केली होती. तसेच त्यांच्यावर लोकशाही उद्ध्वस्त करण्यात भूमिका केल्याचा आरोप केला होता. 29 जून रोजीच्या एका ट्वीटमध्ये त्यांनी सरन्यायाधीशांवर भाजप नेत्याची 50 लाख रुपयांची बाईक चालवल्याप्रकरणी टीका केली. तसेच लॉकडाऊनमध्ये न्यायालयं बंद ठेवल्याने नागरिकांना त्यांच्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला होता.