सिडको पोलिसांनी आवळल्या दिल्लीत जाऊन मुसक्या
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
औरंगाबाद – वाइन शॉपचा परवाना काढून देण्याची थाप मारून ५० लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीने दिल्लीत ज्वेलरीचे दुकान थाटले होते. सिडको पोलिसाने त्या भामट्याच्या दिल्ली येथून मुसक्या आवळल्या.
दयानंद वजलू वनजे (वय ४६,रा.नांदेड), असे या भामट्याचे नाव आहे.
आरोपी दयानंद याने सन-२०१९ मध्ये शहरातील एका व्यापा-याला देशी विदेशी वाईन शॉपचा परवाना काढून देतो, अशी थाप मारली होती. त्याचे राहणीमान देहबोलीवर विश्वास ठेवून व्यापा-याने वेळोवेळी ५० लाख रुपये दयानंदला दिले होते. मात्र, त्यानंतर तो पसार झाला. त्याच्याशी संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापा-याने पोलिसात धाव घेतली होती. तेंव्हापासून दयानंद हा फरार होता.
दरम्यान, दयानंद वनजे हा दिल्ली येथे सौंदर्या ज्वेलर्स नावाचे दुकान चालवत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना खबNयाने दिली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सिडको पोलिसांच्या डीबी पथकाने दिल्ली येथील पटेलनगरातील मेट्रो स्टेशनजवळ सापळा रचून दयानंद वनजे याला ताब्यात घेतले.