सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
श्रीरामपूर : सरकार एकीकडे कोरोनाबाबतचे नियम कडक करत असताना येथील कोविड सेंटरमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत समाज कल्याण विभागाच्या गटई कामगारांच्या टपऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही.
समाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाकडून गटई कामगारांना लोखंडी टपऱ्या दिल्या जातात. या कार्यक्रमासाठी आमदार लहू कानडे उपनगराध्यक्ष करण ससाने, माजी सभापती सचिन गुजर, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जीके पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देव्हारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी एसएम तडवी यांच्यासह 53 लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावामध्ये विना मास्क फिरणा-यावर व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर अनेकदा गुन्हे दाखल केले जातात. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टंसिंगचे कसल्याही प्रकारचे नियम न पाळणे तसेच कोविड सेंटर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असतानाही सेंटरच्या लगत हा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून 53 लाभार्थी आपल्या वाहनांसह उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येणाऱ्या टपऱ्यांचे सुटे भाग हे कवीड सेंटरमधील आवारामध्ये ठेवण्यात आले होते. तेथूनच त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आली. त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकारी जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेणार असतील तर सर्वसामान्यांचे काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यक्रमासाठी कोविड सेंटरमधील खुर्च्या टेबल यांचा वापर
समाजकल्याण विभागाने घेतलेल्या कार्यक्रमासाठी कोविड सेंटरमधील खुर्च्या व टेबल वापरण्यात आले. तसेच कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेले अनेक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वाटपासाठी असणाऱ्या टपर्या कोविडं सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यातील एक टपरी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटण्यासाठी ठेवण्यात आली होती.
कोविडं सेंटरमध्ये बाधित रुग्ण असल्याने तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र असतेच त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात कार्यक्रम घेता येत नाहीत.
– तहसिलदार -प्रशांत पाटील